Jamkhed Nagarparishad Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Municipal Election 2025: जामखेडचा पहिला नगराध्यक्ष कोण? मतदानानंतर चर्चांना उधाण

राम शिंदे व रोहित पवारांचा तुफानी प्रचार; 75% मतदानानंतर जनतेत उत्सुकता वाढली

पुढारी वृत्तसेवा

दीपक देवमाने

जामखेड: जामखेड नगरपरिषद निवडणूक लागल्यापासून मतदारांत मोठा उत्साह दिसून येत होता. सभापती प्रा. राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांनी तळ ठोकून होम टू होम प्रचार केल्याने पहिला नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. अनेक ठिकाणी मतदान करण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या. मतदान वेळ संपली, तरी काही ठिकाणी मतदान केंद्रात गर्दी होती. त्यामुळे पहिल्यांदाच जनतेतून नगरसेवक कोण होणार याच्या चर्चेला उधाण आले आहे.

जामखेड नगरपरिषदेसाठी सरासरी 75.63 टक्के मतदान झाले आहे. किरकोळ प्रकार वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एका मतदान केंद्रावर 97 वर्षांच्या आजी लक्ष्मी क्षीरसागर यांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी यंत्रात बिघाडाच्या किरकोळ तक्रारी येत होत्या. जामखेड नगरपरिषद निवडणुकीत पुरुष 16 हजार 749, तर स्त्री 16 हजार 412 असे एकूण 33 हजार 161 मतदार आहे. त्यापैकी पुरुष 12 हजार 859, तर स्त्री 12 हजार 222 अशा एकूण 25 हजार 81 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक प्रचारादरम्यान सभापती प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार तळ ठोकून जामखेडमध्ये होते. मतदानासाठी पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जामखेड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत झाली, तर नगरसेवक पदासाठीही काही प्रभागात दुरंगी, तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढत झाली. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण पॅनल नाही. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार पुरस्कृत केले होते. शिंदे सेनेच्या पायल बाफना यांनीही जोरदार प्रचार केला. त्यामुळे कोण निवडून येणार याच्या चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुकीत सभापती राम शिंदे व आ. रोहित पवार यांचा पुन्हा संघर्ष पाहायला मिळाला. विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी आ. पवारांवर पराभव जवळ येताना दिसतोय, म्हणूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका केली. या टीकेला आ. पवार यांनी, जामखेडच्या राजकीय मैदानात गुंडशाही विरुद्ध सामान्य नागरिक अशी लढत आहे. याचबरोबर भाजप आणि शिंदे गटाकडून लक्ष्मीदर्शन झाल्याचा आरोपही करण्यात आला. एवढंच नव्हे तर विकासकामांबाबतही सरकारवर थेट टीका त्यांनी केली आहे.

क्रॉस व्होटिंग कुणाच्या पथ्यावर?

नगरपरिषद निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदारांना यावेळी तीन मतदान करायचे होते. नगराध्यक्ष पदासाठी एक व दोन नगरसेवकांसाठी प्रत्येकी एक मत अशी तीन मते टाकावी लागणार होती. परंतु सकाळपासून सायंकाळपर्यंत क्रॉस व्होटिंग होत असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे क्रॉस मतदानाचा कोणाला फायदा व कोणाला तोटा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आता निकालाबाबत चर्चा

दि. 2 रोजी जामखेडच्या मतदारांनी भरभरून 75 टक्के मतदान केले. आता नगराध्यक्ष व नगरसेवकांबाबत चौका चौकात, चहाच्या टपरीवर, नाक्या नाक्यावर मात्र चर्चेला मात्र उधाण आले आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी ही 21 डिसेंबरला होईल म्हणजेच नगराध्यक्ष, तसेच नगरसेवक पदाच्या निकालाची टांगती तलवार उमेदवारांच्या डोक्यावर तरंगत राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT