Jamkhed Encroachment Removal Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Encroachment Removal: जामखेडमध्ये अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा; पक्की घरेही जेसीबीने जमीनदोस्त

बीड रोडपासून धडक कारवाईला सुरुवात; महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यासाठी संयुक्त पथक तैनात

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: शहरातील महामार्गालगतच्या अतिक्रमणांविरोधात अखेर प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून, पक्की घरेही जेसीबी व ब्रेकरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जामखेडकरांच्या संघर्षाचा आणि चर्चेचा विषय ठरलेल्या अतिक्रमण प्रश्नावर प्रशासनाने मंगळवारी (दि. ६) प्रत्यक्ष हातोडा चालविला. बीड रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गाच्या गटारापासून दोन्ही बाजूंना सुमारे तीन मीटर म्हणजेच दहा फूट अंतरातील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. या कारवाईत टपऱ्या, दुकाने आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या अतिक्रमणांसोबतच महामार्गाच्या हद्दीत आलेली अनेकांची पक्की घरेही हटविण्यात आली. अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी, ब्रेकर आदी यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत असल्याने कारवाईला मोठा वेग आला आहे. महसूल प्रशासन, जामखेड नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या वेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, महसूल विभागाचे अधिकारीस तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

तीन वर्षांपासून रखडलेली मोहीम अखेर सुरू

शहरातील महामार्गालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. रस्त्याकडेला उभारलेल्या टपऱ्या, दुकाने, तसेच बांधकामांमुळे मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. महामार्गाच्या कामालाही अतिक्रमणांचा अडथळा निर्माण झाल्याने काम रखडले होते.

पुढील टप्प्यात संपूर्ण शहरात कारवाई?

प्रशासनाने ही मोहीम केवळ बीड रोडपुरती मर्यादित न ठेवता शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांवरही कारवाई करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे. शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सुरू झालेली ही कारवाई स्वागतार्ह असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, अतिक्रमण हटविताना कोणताही भेदभाव न करता समान निकष आणि कायदेशीर प्रक्रिया पाळावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रश्नावर जामखेडकरांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. निवेदने, बैठका आणि आंदोलनांच्या माध्यमातून अतिक्रमण हटविण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. अखेर प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने जामखेडकरांच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ही कारवाई जामखेडकरांच्या पाठपुराव्याचे यश

शहरातील महामार्गालगतच्या अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून जामखेडकरांच्या चर्चेचा आणि संघर्षाचा विषय होता. अखेर प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई म्हणजे जामखेडकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आहे. प्रशासनाने ही मोहीम निष्पक्षपणे आणि सातत्याने पुढे नेत महामार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा.” - अवधूत पवार, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT