

नगर: शाळेची घंटा वाजली की मोबाईलला विराम आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य...! शिक्षकांनी स्वतःहून स्वीकारलेल्या या शिस्तीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी चिंचोंडी पाटील येथील जि.प. शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे. शाळेतील १६ शिक्षकांनी शालेय वेळेत मोबाईल वापरणे बंद केले असून, सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाबद्दल भंडारी यांनी शाळेला अभिनंदनाचे पत्र पाठविले आहे.
शाळेच्या संगणक प्रयोगशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आनंद भंडारी चिंचोंडी पाटील येथे आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांशी हितगुज साधले. विद्यार्थी व शिक्षकांनी मोबाईलपासून दूर होऊन वाचनाकडे वळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. काही ठिकाणी शाळेच्या वेळेत अनेक शिक्षकांचे मोबाईल अविरत सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, शाळेबाहेरही अनेक शिक्षक मोबाईलवर व्यस्त असल्याचा अनुभव आला आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले होते.
या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी शालेय वेळेत मोबाईलचा वापर टाळल्यास शिक्षणाची गुणवत्ता, मनःशांती आणि वाचनसंस्कृती वाढीवर अनुकूल परिणाम होईल, असा विश्वास भंडारी यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या आवाहनाला चिंचोंडी पाटील शाळेतील शिक्षकांनी कृतीतून उत्तर दिले आहे.
शिक्षकांनी स्वीकारली मोबाईलमुक्त शिस्त!
चिंचोंडी पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी पट ३३० असून शाळेत १६ शिक्षक कार्यरत आहेत. ग्रामस्थांची नेहमीच मदत मिळत असल्याने शाळा कायम प्रगतिपथावर आहे. आता सीईओंच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षकांनी शालेय वेळेत मोबाईलपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळी १० वाजता शाळा सुरू होताच सर्व शिक्षक आपले मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करतात आणि सायंकाळी ४ वाजता ते पुन्हा शिक्षकांना दिले जातात. त्यामुळे शालेय वेळेत शिक्षकांचे लक्ष मोबाईलऐवजी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे केंद्रित राहते. विशेष म्हणजे, इंटरॲक्टिव्ह बोर्डच्या माध्यमातून अध्यापन करण्यासाठी सायंकाळी ४ वाजता मोबाईल परत दिले जातात.
मुख्याध्यापक पंढरीनाथ पंडित म्हणतात...
आमच्या शाळेचा पट ३३० आहे. १६ शिक्षक आहेत. ग्रामस्थांची नेहमी मदत असते. त्यामुळे आमची शाळा गुणवत्तेतही आघाडीवर आहे. सीईओ भंडारी यांनी केलेल्या आवाहनानुसार, आमच्या शाळेतील सर्व शिक्षक सकाळी १० वा. त्यांचे मोबाईल मुख्याध्यापक या नात्याने माझ्याकडे जमा करतात. ४ वाजता इंटरॲक्टिव्ह बोर्डवर अध्यापन करण्यासाठी मोबाईल परत दिले जातात. प्रशासकीय कामासाठी माझा मोबाईल नंबर कायम सुरू असतो. मोबाईल बंद केल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे आम्हाला जाणवले आहे. हा उपक्रम आम्ही कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहोत.
‘चिंचोंडी पाटील पॅटर्न’ जिल्ह्यात रुजणार?
शिक्षकांच्या हातातील मोबाईल हा आजच्या डिजिटल शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असला, तरी शाळेच्या वेळेत त्याचा वापर किती आणि कशासाठी असावा, हा प्रश्न अनेकदा चर्चेत येतो. अशा परिस्थितीत चिंचोंडी पाटीलच्या शिक्षकांनी स्वतःहून मोबाईल मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचा घेतलेला निर्णय विशेष ठरत आहे. या उपक्रमाची दखल घेत सीईओ भंडारी यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले असून, या शाळेचे अनुकरण जिल्ह्यातील सर्व शाळांनी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता चिंचोंडी पाटीलच्या या ‘मोबाईलमुक्त शालेय वेळे’चा प्रयोग जिल्ह्यातील इतर शाळांमध्येही घेऊन जाण्यासाठी शिक्षक संघटना आणि शिक्षक पुढे येणार का? याकडे लक्ष लागले आहे.