

संदीप रोडे
देशाला सहकाराची दिशा देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात आजही सहकारात राजकारण केले जात नाही. त्यामुळेच येथे साखर कारखाने असो की जिल्हा बँक, राजकीय जोडे बाजूला ठेवूनच कारभार केला जातो. सहकाराचा अलिखित मूलमंत्र आजही जपणाऱ्या अहिल्यानगरचा पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला तो एकमेकांशी राजकीय हाडवैर असणाऱ्या विखे-थोरातांच्या एकोप्याने. त्याचाच परिपाक म्हणून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत नेवाशातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड झाली, तर शेवगावातून माजी आमदार चंद्रशेखर घुले किंवा त्यांच्या पत्नी राजश्री आणि संगमनेरातून बाळासाहेब थोरातांचे जावई रणजितसिंह देशमुख यांचाही बिनविरोधचा मार्ग मोकळा झाल्यात जमा आहे. जिल्हा बँकेची निवडणूक ‘विखे विरोधात सगळे’ अशाच पद्धतीने आजपर्यंत झाल्याचा इतिहास; पण यंदाच्या निवडणुकीत मात्र विखेंनी हे समीकरणच बदलून ‘सुजयारंभ’ केला. त्यामुळेच राज्याचा उच्चपदस्थ चेहरा प्रा. राम शिंदे यांच्यावरही थांबण्याची नामुष्की ओढवली...
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बाळासाहेब थोरात व डॉ. सुजय विखे यांच्या समझोता बैठकीनंतर जिल्ह्यात गहजब उडाला. एकीकडे प्रस्थापित एकत्र येत असताना दुसरीकडे विस्थापितांनी मोटबांधणी सुरू केली; मात्र ती औटघटकेची ठरू पाहते आहे. विस्थापितांचे नेतृत्व विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे करणार हे एव्हाना स्पष्ट झाले होते. त्यांच्याच नेतृत्वात विस्थापितांची वाटचाल सुरू होती. माजी आमदार भानुदास मुरकुटे, राहुल जगताप या सहकारातील नेत्यांसह खा. नीलेश लंके, ऋषीकेश ढाकणे यांसारखे चेहरे विस्थापितांच्या बाजूने वळले. पण त्यांची विरोधाची हवा जवळपास संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विखे-थोरातांच्या एकत्र येण्याने आ. संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप, तसेच बाळासाहेब थोरातांचे जावई रणजितसिंह देशमुख यांनी नव्या दमाने जिल्ह्याच्या सहकारात पाऊल टाकले आहे. देशमुख संगमनेर दूध संघाचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिले, तर जगताप त्या तुलनेत अगदीच नवखे.
दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली असताना ग्रामीण विकासाचा पाया असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत चिखलफेक नको म्हणून ती बिनविरोध करण्यासाठी डॉ. सुजय विखेंनी दोन पावलं माघार घेत बाळासाहेब थोरातांसोबत जुळवून घेतले. जिल्हा बँकेची निवडणूक असली तरी पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील मात्र फ्रंटफुटवर दिसले नाहीत. डॉ. सुजय विखे मात्र कमालीचे ॲग्रेसिव्ह दिसत आहेत. ते सडेतोड बोलतात, परिणामाची तमा बाळगत नाहीत. जे असेल ते रोखठोक असा त्यांचा बाणेदार स्वभाव. प्रसंगी त्यांना त्याची किंमत मोजावी लागते; पण ते बॅकफुटवर जात नाहीत. राजकारणात माहीर असलेले सुजय आता जिल्ह्याच्या सहकाराच्या आखाड्यात सक्रिय झाले; नव्हे, आता सहकारात विखेंचा सुजयारंभ झाल्याचा अदमास अनेकांना एव्हाना आलाच असेल. बँक निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच सुजय विखेंचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आले. मात्र अत्यंत संयमाने त्यांनी तो चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ‘लिमिटेड स्पीच’ मार्गावर चालण्याचा निश्चय सुजय विखेंनी केला. राजकीय मतभेद असले तरी मनभेद नसल्याने राजकीय जोडे बाजूला ठेवत त्यांनी सहकारातील जुन्या जाणत्या ज्येष्ठांच्या गाठीभेटी घेत अनुभवींना सोबत घेण्याच्या दिशेने पाऊल टाकले. त्यासाठी राजकारणातील स्वकियांनाही त्यांनी बाजूला ठेवले.
एकीकडे विस्थापितांची मोटबांधणी सुरू होती, तर दुसरीकडे सुजय विखेंची आत्मविश्वासी वाट‘चाल’ सुरू होती. शनिवारी सोनईत झालेल्या बाळासाहेब थोरात - सुजय विखे - शंकरराव गडाख यांच्या गुप्त बैठकीची परिणती सोमवारी शंकरराव गडाख यांच्या बिनविरोध निवडीत झाली. गडाखच नव्हे तर थोरातांचे जावई रणजितसिंह देशमुख, घुले, तसेच आमदारत्रयी प्राजक्त तनपुरे, अक्षय कर्डिले आणि विवेक कोल्हे यांचीही पावले बिनविरोधच्या दिशेने पडली आहेत.
काही झाले तरी जिल्हा बँकेत संचालक व्हायचेच यासाठी प्रा. राम शिंदे यांनी सुरुवातीलाच जिल्हाभर दौरा केला. सहकारातील अनुभवींच्या गाठीभेटी घेतल्या. प्रस्थापितांना बिनविरोधाकडे जायचे असेल तर ‘माझ्याशिवाय अशक्य’ असे हाकारे दिले. तिसऱ्या अपत्त्याच्या नियमाने चर्चेच्या स्थानी आलेले प्रा. शिंदे यांनी अतरात्म्याचा आवाज ऐकला आणि थांबण्याचा निर्णय घेतला. अर्थात राज्यात उच्च असलेल्या सभापतिपदाची गरिमा राखण्याची गरज सांगत त्यांनी काहीशी सारवासारवही केली. आता विस्थापितांचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, की बिनविरोधासाठी समझोता होणार, हे समजण्यासाठी विजयादशमीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
पुन्हा सुजय-संग्राम
आमदार संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे ही जोडी अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमुळे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभर चर्चेत आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्या वेळी त्यांचे कौतुक केले होते. एकमेकांच्या संगतीने राजकीय वाटचाल करणारी ही जोडी जिल्हा बँकेतही एकत्र दिसली. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना विखे-जगताप जोडी ‘राजयोग’वर बँकेची रणनीती आखत होती. नेमके त्याच वेळी सभापती शिंदे यांच्या माघारीची वार्ता त्यांच्या पर्यंत पोहचली, हेही योगायोगाने ‘राजयोगा’च्या दिशेने पडलेले पाऊलच ठरावे...
विस्थापितांच्या वाटेत काटे
जिल्हा बँक हा राजकारणाचा आखाडा नाही. तेथे सामान्य शेतकरी- सभासदांचे हित पाहावे लागते. बँकेचा कारभार करताना विश्वास जपावा लागतो. त्यासाठी मतभेद असले तरी मनभेदाला तिलांजली द्यावी लागते. बँकेचा कारभार करताना सहकारातील अनुभवही लागतोच, शिवाय राज्याच्या नेतृत्वाची साथही. विखे-थोरात-गडाख यांसारख्या मातब्बर कुटुंबांना अनुभव व साथ दोन्हींचे भरभक्कम पाठबळ आहे. त्या तुलनेत उच्चपदस्थ असले अन् राजकारणातील बारकावे माहीत असले तरी सहकाराचा अनुभव नसलेले प्रा. राम शिंदे, खा. नीलेश लंके विस्थापितांचे नेतृत्व करायला निघाले. पण त्याच्या वाटेत अडथळेच आले. आता शिंदे यांनी माघार घेतलीच आहे, खा. लंके विस्थापितांचा वारू किती दूरपर्यंत नेतात, हे पाहावे लागेल.
डॉक्टर सुजय यांच्याकडून ‘करेक्ट ऑपरेशन’
डॉ. सुजय विखे हे स्पष्टोक्तेपणासोबतच डावपेचातही परिपक्व झाल्याचे अनेकांनी पाहिले, अनुभवले. जिल्ह्याच्या सहकारात दमदार पाऊल टाकतानाच डॉक्टर सुजय यांनी विरोधकांचे ऑपरेशन सुरू केले. बनावट अनुमोदकाच्या आक्षेपाने विखे विरोधक एकनाथ घोगरे त्याचा निकाल लागेपर्यंत व्हेंटीलेटरवर असल्याचा दावा विखे समर्थक करतात. विखेंचा आक्षेप ‘करेक्ट’ निघाल्यास एकनाथ घोगरे यांचा अर्ज बाद होईल, अन् सुजय यांचा बिनविराेधाचा वारू सुसाट सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र हे आज बुधवारच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.