Fetal Determination Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Illegal Sex Determination Abortion Case: अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; श्रीरामपूरमध्ये डॉक्टरसह 12 जणांना अटक

बेकायदा गर्भपात व लिंग निदान प्रकरणात मोठे खुलासे; तपासाची व्याप्ती पुणे-नाशिकपर्यंत

पुढारी वृत्तसेवा

नगर/श्रीरामपूर: पिंपरी निर्मळ येथे गर्भलिंग निदान केल्यानंतर श्रीरामपूरच्या डॉ. कुटे हॉस्पिटलमध्ये तिघींचे गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीची व्याप्ती वाढत असून नाशिकमधील काही डॉक्टरांचा यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. अटकेतील डॉ. कुटे व दोघा एजंटांची पोलिस कोठडी न्यायालयाने रविवारपर्यंत (दि.10) वाढविली आहे.

पिंपरी निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश 29 एप्रिल रोजी करण्यात आला. त्यात डॉ.राहुल भणगे व एजंट अभिजीत भुसाळ यांना अटक करण्यात आली. त्यांच्याच माहितीनुसार श्रीरामपूरच्या डॉ. रवींद्र कुटे यांच्यासह प्रदीप ढगे व नीलेश भवर या एजंटांना अटक करण्यात आली. यातील डॉ. कुटे यांना बेकायदा गर्भपात केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

पोलिसांनी तपासाला गती दिल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. डॉ. भणगे व एजंट ढगे यांनी गर्भलिंग निदान करणारे मशीन पुण्यातून खरेदी केल्याचे समोर आले असून पोलिसांनी पुण्यातील दोघांना आरोपी केले आहे. दोन डॉक्टर, चार एजंट, आणि सहा गर्भवती महिलांचे पती अशा 12 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. आरोपींमध्ये पुण्यातील दोघांची भर पडली असून नाशिकमधील काही डॉक्टरांचा सहभाग असल्याचे चित्र समोर येताच त्यांनाही आरोपी केले जावू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

ज्या महिलांचे गर्भलिंग निदान करण्यात आले. त्यांची ओळख पटवली जात आहे. ओळख पटल्यानंतर पोलिस त्या महिलांचे जबाब नोंदवत आहेत. काही महिलांचे जबाब नोंदविल्यानंतर तिघींचे डॉ. कुटे हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात केल्याचे समोर आले. हा गर्भपात करण्यासाठी एजंटाची टोळी राबत असल्याचे समोर आले.

विशिष्ट ठिकाण अन्‌‍ रोकडा व्यवहार

गर्भलिंग निदानासाठी महिलांची संख्या आठ ते दहा होईपर्यंत एजंट वाट पाहत. ही संख्या झाली की दिवस लिंग निदानाकरीता ठराविक वेळ व दिवस ठरवला जात. त्या वेळेची व दिवसाची माहिती गर्भवती महिलेचा पती किंवा नातेवाईकांना देत विशिष्ट ठिकाणी बोलवले जात. त्या विशिष्ठ ठिकाणी एजंट अगोदर रोकड ताब्यात घ्यायचे. तेथून फक्त महिलांनाच गर्भलिंग निदानाकरीता एजंट वेगळ्या कारने घेवून जात. गर्भलिंग निदान झाल्यानंतर त्या महिलांचे पती, नातेवाईक जेथे थांबले असतील तेथे पुन्हा पोहच केले जायचे.

लिंग निदानासाठी डॉक्टरला दहा तर एजंटला तीन हजार

लिंग निदान आणि ‌‘ती‌’चा गर्भपात करण्यासाठी एजंटाची टोळी सक्रिय होती. हे एजंट गर्भवती महिला शोधून त्यांचे लिंग निदान करत. लिंग निदानासाठी डॉक्टर भणगेला दहा हजार तर एजंटांना प्रत्येकी तीन हजार मिळत होते. जसे एजंट वाढतील तशी लिंग निदान तपासणीची रक्कम घेतली जात होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT