

जामखेड: जामखेड नगरपरिषदेत जन्म दाखल्यांसाठी लाचेची मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत थेट सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे. भ्रष्टाचाराचा खरा ‘शार्क’ अजूनही मोकाट फिरीत आहे, असा घणाघात पवार यांनी केला.
जन्म दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगरपरिषदेतील लिपीक आणि मदतनीस यांच्यावर कारवाई केली. मात्र, या प्रकरणानंतर आमदार पवार यांनी सोशल मीडियावरून आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नगरपरिषदेतील कथित भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली.
भाजपच्या ताब्यात असलेल्या जामखेड नगरपरिषदेतील भ्रष्ट कारभाराचा एसीबीने पंचनामा केला आहे. पण कारवाई फक्त खालच्या स्तरावर होत आहे. नगरपरिषद प्रशासनातील भ्रष्टाचाराचे मूळ असलेला सर्वांत मोठा ‘शार्क मासा’ कोण आहे, हे जामखेडकरांना चांगले माहिती आहे. त्याच्यावर कारवाई न करता फक्त कर्मचाऱ्यांवर धडक कारवाई करून भ्रष्टाचार थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार पवार यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, भ्रष्टाचाराच्या पाण्यात पोहणाऱ्या या शार्क माशाला आधी कारवाईच्या जाळ्यात अडकवून बाहेर काढण्याची गरज आहे. ते झाल्यास बाकीच्या चिंगळ्याही सरळ काम करतील आणि जामखेडकरांची भ्रष्ट कारभाराच्या त्रासातून सुटका होईल, असे म्हटले.
विशेष म्हणजे, संबंधित मुख्याधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या छायेत असलेल्या अधिकाऱ्याला पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला.
दरम्यान, एसीबीच्या कारवाईनंतर जामखेड नगरपरिषदेत मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात आणखी काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्येही नगरपरिषदेतील कारभाराबाबत संताप व्यक्त होत असून, केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता संपूर्ण भ्रष्ट साखळीची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.