

राहुरी: “तुम्ही आमचे पैसे परत कधी देणार?” असा जाब विचारत आरोपींनी दोघा भावांना शिवीगाळ, दमदाटी करत काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील उंबरे येथे नुकतीच घडली.
या मारहाणीनंतर फिर्यादीच्या खिशातील 35 हजार रुपयांची रोकडही जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत चांगदेव ज्ञानदेव ढोकणे (वय 43, व्यवसाय शेती, रा. उंबरे, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, दि. 2 मे रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास चांगदेव ढोकणे व त्यांचे भाऊ बाबासाहेब ढोकणे हे उंबरे गावातील बसस्थानकाजवळ उभे असताना आरोपींनी त्यांना गाठले.
“तुम्ही आमचे पैसे परत कधी देणार?” असा जाब विचारत आरोपींनी दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चांगदेव ढोकणे यांनी “मी तुमचे सर्व पैसे परत दिले आहेत,” असे सांगितल्याने आरोपी संतापले. त्यानंतर आरोपींनी दोघा भावांना अश्लील शिवीगाळ करत काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच “पैसे परत दिले नाहीत तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मारहाणीच्या गोंधळात आरोपींनी चांगदेव ढोकणे यांच्या खिशातील 35 हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आण्णासाहेब फकीरा ढोकणे, रोहित आण्णासाहेब ढोकणे, अमोल जालिंदर ढोकणे व पवन रामभाऊ ढोकणे (सर्व रा. उंबरे, ता. राहुरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.