Hydroponic Fodder Pudhari
अहिल्यानगर

Hydroponic Fodder: दुष्काळात हायड्रोपोनिक चारा ठरणार वरदान!

दोन-तीन महिन्यांत चारा टंचाईची शक्यता; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन, ६५ हजारांवर पशुपालकांचे सर्वेक्षण पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यात सध्‍या पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्‍ध आहे. मात्र, भविष्‍यात टंचाई भासणार आहे. कमी पाण्‍यात आणि खर्चात निर्माण होणार्‍या हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी पुढे यावे. हाच चारा दुष्‍काळावर उतारा ठरणार असल्‍याचा विश्‍वास पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. दरम्‍यान, चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलली असून, जिल्ह्यात किती जनावरे आहेत याची पडताळणी करण्‍यासाठी पशुपालकांचे सर्वेक्षण सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पालकमंत्री विखे पाटील यांनी मंगळवारी (दि.१३) व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगव्‍दारे दुष्‍काळी परिस्‍थितीचा आढावा घेतला. त्‍याप्रसंगी ते बोलत होते. ते म्‍हणाले की, यंदा धरणांच्‍या पाणलोट क्षेत्रात अधिक तर लाभक्षेत्रात मात्र कमी पाऊस झाला. त्‍यामुळे यंदा दुष्‍काळी परिस्‍थितीला सामोरे जावे लागत आहे. सध्‍या तरी चारा उपलब्‍ध आहे. दोन-तीन महिन्‍यांनंतर चाराटंचाई भासणार आहे. जनावरांना चारा उपलब्‍ध व्‍हावा यासाठी लवकरच चारा डेपो सुरू करण्‍याबाबत शासनाकडे मागणी केल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

अशा परिस्‍थितीतही जनावरांसाठी सकस आणि पोषक असलेल्‍या हायड्रोपोनिक पद्धतीच्‍या चार्‍याचे उत्‍पादन करण्‍यासाठी शेतकर्‍यांनी पुढे यावे. हा चारा मुबलक झाल्‍यास चाराटंचाईवर मात करणे शक्‍य होणार आहे. जिल्ह्यात सध्‍या १६९ टँकर सुरू असून, आवश्‍यकतेनुसार टँकरचे पाणी साठवण्‍यासाठी गावनिहाय पाण्‍याच्‍या टाक्‍या उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. फिल्‍टर केलेले पाणीच टँकरमध्‍ये भरले जात आहे. टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करणारा राज्‍यातील पहिलाच जिल्‍हा असल्‍याचे त्‍यांनी आवर्जून म्‍हटले आहे.

दरम्‍यान, पालकमंत्री विखे पाटील यांच्‍या निर्देशानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील पशुपालकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, ६५ हजारांवर पशुपालकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील हिरवा व कोरडा चारा, मूरघास, पशुखाद्य आणि रब्बी हंगामात चारा उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या क्षेत्राची माहिती संकलित करून पशुधनाच्या भविष्यातील चारा गरजेचे नियोजन सुरू आहे.

सर्वेक्षण पशुधनगणनेच्या दृष्टीने महत्त्वाचे

सर्वेक्षणात केवळ चारा उपलब्धतेची माहिती संकलित केली जात नसून, पशुधनाच्या नोंदींचीही पडताळणी केली जात आहे. जनावरांच्या कानातील बिल्ला क्रमांकांची भारत पशुधन प्रणाली अर्थात ‘एनडीएलएम’वरील नोंदींशी पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे पशुधनाची माहिती अद्ययावत करण्यास मदत होणार असून, हे सर्वेक्षण पशुधन गणनेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT