श्रीरामपूर: गोदावरी नदीवरील तीन बंधाऱ्यात पाणी सोडण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून चार दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आपण त्यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केल्यानंतर नागमठाण पुलावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.
काल रविवारी (दि. १८) सायंकाळी नागमठाण पुलावर आंदोलनस्थळी महंत रामगिरी महाराज यांनी भेट देऊन आवाहन केल्याने शेतकरी संघटनेचे गणेश तांबे व सहकाऱ्यांनी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या समवेत काल चौथ्या दिवशी आंदोलन स्थगित केले. नाशिक पाटबंधारे विभागातील दहा बंधारे पूर्ण क्षमतेने भरले, नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील बंधाऱ्यात वाढीव दोन-दोन ढापे शेतकरी काढू देत नसल्याचे खापर शेतकऱ्यांवर फोडून जबाबदारी झटकली.
मात्र अहिल्यानगर विभागातील बंधारे कोरडे राहिल्याने वांजरगाव, खानापूर, कमालपूर बंधारे वैजापूर-श्रीरामपूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी प्रारंभी महंत रामगिरी महाराज यांना भेटुन वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची विनंती केली. प्रशासनाने बंधाऱ्यात पाणी सोडुनही बंधाऱ्यात पाणी न आल्याने नागमठाण पुलावर श्रीरामपूर, वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलनात सर्वपक्षीय सहभागी घेतला होता.
काल सायंकाळी महंत रामगिरी महाराज यांनी आंदोलकांच्या भेटीत सविस्तर चर्चा केली. जलसंपदा मंत्री विखे यांनी चार दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत निश्चित मार्ग काढू, असे आश्वासन दिले आहे. या शब्दाला मान ठेवून आपण आंदोलन स्थगित करावे. वेळ पडल्यास मी मुख्यमंत्री यांना विनंती करेन, अशी ग्वाही महंत रामगिरी महाराज यांनी दिल्यानंतर शेतकरी संघटनेचे गणेश तांबे, स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे निलेश शेंडगे व सहकाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
महंत रामगिरी महाराज आंदोलनस्थळी ४ वाजता भेट देणार, असे मेसेज पोहचताच पुलावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली होती. महाराजांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित केल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे सुभाष भराडे, साहेबराव चोरमल, शरद आसने, भरत आसने, अनिल जगरूपे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिता वानखेडे व सहकारी महिला, दादासाहेब तोडमल, भाऊराव भराडे, डॉ. गणेश बाहुले, निलेश आदिक, खानापूर सरपंच ज्ञानदेव आदिक, रामपुरचे सरपंच सुरेश भडांगे, संदिप जगताप, दिनकर बनसोडे, आण्णासाहेब बनसोडे, गणेश आदिक, बंडू सवई, मधुकर बनसोडे, ताहेर शेख, सद्दाम शेख, सिकंदर शेख, आप्पासाहेब ठुबे, रामनाथ तांबे, वैभव सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.