कोपरगाव : कोपरगावच्या आकाशाला लाभलेली निरभ्र चादर आणि तारकांनी सजलेले नभांगण अशा रम्य वातावरणात के. जे. सोमैया महाविद्यालयातील अवकाश निरीक्षण केंद्रातर्फे आकाश निरीक्षण व जेमिनीड उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम कोपरगाव परिसरातील विद्यार्थी, अवकाश अभ्यासक व खगोलप्रेमींसाठी खुला व मोफत ठेवण्यात आला होता, अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.
महाविद्यालयातील अत्याधुनिक अवकाश निरीक्षण केंद्रातील दहा इंची शक्तिशाली दुर्बिणीच्या साहाय्याने शनी व गुरु यांसारखे भव्य ग्रह तसेच आकाशातील व्याध व राजन्य यांसारखे तेजस्वी तारे प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले झाले. आकाशातील गूढ सौंदर्य अनुभवताना उपस्थित खगोलप्रेमींच्या डोळ्यांत कुतूहल व आश्चर्य दाटून आले.
महाविद्यालयाच्या प्रांगणातून विविध तारकासमूह, भारतीय नक्षत्रे, विविध राशी, ध्रुवतारा यांची रंजक व माहितीपूर्ण ओळख करून देण्यात आली. तसेच जेमिनीड उल्का वर्षावाचे वैज्ञानिक महत्त्व व वैशिष्ट्ये भूगोल विभागाचे व अवकाश निरीक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके यांनी सोप्या व रसाळ शैलीत उलगडून सांगितली.
पदार्थविज्ञानशास्त्र विभागाचे डॉ. नीलेश पोटे यांनी खगोलभौतिकीशास्त्रातील ताऱ्यांचा जन्म, त्यांची तेजस्विता व विश्वातील त्यांचे स्थान याविषयी सखोल मार्गदर्शन करून उपस्थितांना विज्ञानाच्या विश्वभ्रमणावर नेले.
या उपक्रमात कोपरगाव व परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच शंभरहून अधिक खगोलप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, डॉ. महारुद्र खोसे, प्रा. संपत माळी, प्रा. जयश्री खंडिझोड, प्रा. श्रावणी आढाव आदी उपस्थित होते. विश्वस्त संदीप रोहमारे यांनी महाविद्यालयाच्या विज्ञानप्रेमी वाटचालीचे कौतुक केले.