नेवासा: तालुक्याील कुकाणा येथील बसथांबा परिसर, जेऊर हैबती चौक, देवगाव चौक व नेवासा रोड परिसरातील पाच दुकानांत रविवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास चोऱ्या झाल्या. सीसीटीव्ही संचासह विद्युतपंप, रोख रक्कम चोरट्यानी पळवली. मात्र, चोरट्याचे वाहन, चोरटे काही ठिकाणच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याने तपास लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कुकाणा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अशोक गांधी यांच्या किराणा दुकानाचे शटरचे लॉक तोडून चोरट्यानी गल्ल्यातील किरकोळ रक्कम नेली. सीसीटीव्ही डीव्हीआर काढून नेला. आर्ले पाटील पतसंस्था दरवाजाचे तीन दरवाजा लॉक तोडले.
जेऊर हैबती चौकात दत्त मशिनरी दुकानातून विद्युत पंप, तसेच साईश्रद्धा पेट्रोल पंपासमोरच्या दोन दुकानांत किरकोळ चोऱ्या झाल्या. पोलिसांची गस्ती वरील गाडी तीन वाजता येऊन गेल्यानंतर सव्वा चार वाजेच्या सुमारास या घटना घडल्या आहेत विशेष म्हणजे चोरट्यानी सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही संच पळवून नेले आहेत.
लगतच्या काही दुकानांतील सीसीटीव्हीत एक इंडिया व्हिस्टा गाडी आणि पाचजण आढळून आले आहेत. रविवारी श्वास पथक, ठसे तज्ज्ञ पथकांसह नेवासा पोलिस निरीक्षक महेश पाटील, कुकाणा दूरक्षेत्र उपनिरीक्षक मनोज अहिरे यांनी चोऱ्या झालेल्या दुकानात पाहणी केली. डॉग स्कॉड पथकाच्या सीमा या श्वानाकडूनही तपास करण्यात आला.
मात्र, उपयोग झाला नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याने तपासाला मदत होईल, याचा तपास लवकर लागेल असा विश्वास उपनिरीक्षक अहिरे यांनी व्यक्त केला. या प्रकरणी फिर्याद घेण्याचे काम पोलिसांत सायंकाळी सुरू होते. सर्व चोरटे तरुण असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहेत.