नगर: केंद्र शासनाचे रसायन व खत मंत्रालय व राज्य शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या नवीन Framework for Fertilizer Sale (FFS) डिजिटल खत वितरण प्रणालीची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२०) जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची विशेष आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, कृषी निविष्ठा संघटनेचे प्रतिनिधी छबुराव हराळ व विविध रासायनिक खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत FFS ॲॅप कार्यपद्धती व खत नियोजन,शेतकऱ्यांसाठी पारदर्शक, सुलभ व तंत्रज्ञानाधारित खत वितरण व्यवस्थेवर विशेष भर देणे आदीबाबींवर चर्चा झाली. जिल्ह्यातील शेतकर्यांनी आधुनिक व पारदर्शक खत वितरणासाठी FFS ॲॅपचा जास्तीत जास्त वापर करूनआवश्यक असणाऱ्या खतांचे आरक्षण करून ऐन हंगामात होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी यावेळी केले. जिल्ह्यात १०० टक्के खरीप पेरणी झाली असून या पिकांना मुबलक खते उपलब्ध आहेत.
६५ हजार टनांपेक्षा अधिक खतांचा साठा
जिल्ह्यात ६५ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून, टंचाईची शक्यता नाही. परवान्यांचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले असून उर्वरित प्रकरणांमधील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. खत वितरणातील पारदर्शकतेसाठी गोदामातील प्रत्यक्ष साठा व e-PoS मधील डिजिटल साठा नियमितपणे अद्ययावत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी ‘एफएफएस’चे फायदे
सातबारा व पीक नोंदीनुसार जमिनीच्या क्षेत्रफळानुसार अचूक खतांचे प्रमाण ॲॅपद्वारे सुचविले जाणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. शेतकऱ्यांना वाजवी व शासकीय दरात खते उपलब्ध होऊन कोणत्याही सक्तीशिवाय केवळ आवश्यक खतांचीच खरेदी करणे शक्य होणार आहे. दुकानात जाण्यापूर्वीच शेतकर्यांना तालुक्यातील अधिकृत कृषी सेवा केंद्रांमधील उपलब्ध प्रत्यक्ष साठा (Live Inventory)तपासून स्वतःच्या पसंतीचे केंद्र निवडता येणार आहे. ॲॅपवर बुकिंगनंतर मिळणारा QR कोड e-PoS वर स्कॅन करून खत मिळणार आहे. शेतकर्याला स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे तीन दिवसांच्या आत खत खरेदी करता येणार आहे.