नेवासा: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तद्नंतर 1 एप्रिलपासून रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ लागू करण्यात आली असून, एनपीके (खतांच्या एका गोणीमागे (बॅग) 225 ते 375 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. वर्षात तिसऱ्यांदा खत दरवाढ झाली आहे. रासायनिक खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.
ऐन खरीप पूर्वतयारीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचे दर वाढले आहेत, तसेच लिंकिंगच्या सक्तीमुळे अनावश्यक खतेही घ्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड बसतो. ही दरवाढ वर्षातून तिसऱ्यांदा केली गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.
खतांच्या भाववाढीमागे लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात घटल्याने किमतींवर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बॅगमागे किमान 225 ते 375 रुपयांची वाढ होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शेतीच्या उत्पादनखर्चात भरमसाट वाढ होत असल्याने त्यातच काही महिन्यांवर खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या बी-बियाणे आणि खतांची जुळवाजुळव करत आहेत.
खत दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे. आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना खतांच्या चढत्या किमतींमुळे बळिराजा हवालदिल झाला आहे. दरवाढीच्या घोषणेनंतर बाजारात जुन्या खतांचा साठा असूनही काही ठिकाणी चढ्या दराने खतांची विक्री होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने खतांच्या साठ्यावर आणि विक्रीवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. जशी एकीकडे शेती निगडित वस्तूंच्या दरात मोठी वाढ केली जाते, तशी शेती पिकांनाही चांगला दर द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
सध्या रब्बी हंगामातील गहू, कांदा व हरभरा आदी पिकांची काढणी सुरू आहे, पण गव्हाला 1800 ते 2100 प्रतिक्विंटल दर बाजारात मिळत आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून हाच दर पाहायला मिळत आहे. कांदा पिकाला 700 ते 750 दर प्रतिक्विंटल जागेवर असल्याने शेतकऱ्यांना या पिकातून उत्पादनखर्चही निघणे अवघड होऊन बसले. त्यात वर्षभरातून रासायनिक खतांच्या किंमती तीन वेळेस वाढून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम हे सरकार माध्यमातून होत आहे.अशोकराव नांदे, सामाजिक कार्यकर्ते, पाचेगाव