राहुरी : एकेकाळी नगर जिल्ह्यात सोन्याचा धूर निघणार्या डॉ. तनपुरे कारखान्याच्या धुराड्याला राजकीय उदासिनतेने काळोखाने ग्रासले आहे. बंद पडलेला तनपुरे कारखान्यावर जप्तीची नामुष्की ओढावली. कोट्यवधी रुपयांचे कर्जाच्या कचाट्यात असलेल्या तनपुरे कारखान्याचे हित जोपासणारे ‘आम्हीच’ म्हणत तब्बल 4 पॅनलच्या माध्यमातून राजकारण पेटल्याचे चित्र आहे. एकीकडे बिनविरोधसाठी पुढाकार, तर दुसरीकडे गटागटात पॅनलचीही मजबूत बांधणी करताना पॅनलप्रमुख दिसत आहे. त्यामुळे बिनविरोधचे गणित न जुळल्यास निवडणूक अटळ असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. (Ahilyanagar news update )
तनपुरे कारखान्याची निवडणूक जाहीर होताच अनेक जणांनी ‘मीच कारखान्याला वाचविणार’ असे सांगत निवडणूक विभागाकडे अर्ज खरेदीसाठी धाव घेतली. परिणामी 180 अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा धुसर आहे. तनपुरे कारखाना निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेण्यासाठी माजी खा. डॉ. सुजय विखे यांनी नकार दिला. त्यामुळे विखे समर्थक व भाजपच्या नेत्यांनी आ. शिवाजीराव कर्डिले यांना साकडे घातले. आ. कर्डिले यांनीही विखे समर्थक व भाजपच्या नेत्यांच्या अपेक्षेनुरूप मित्र पक्षांना सोबत घेत तनपुरे कारखान्याचा किल्ला सर करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे भाजप व मित्र पक्षाकडून तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. शिंदे सेना गटात नुकतेच प्रवेश केलेले संभाजी प्रतिष्ठाणचे राजू शेटे यांनी शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून उमेदवारांची जुळवाजुळव केली आहे. भाजप मित्र पक्ष व शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळाला आव्हान देण्यासाठी कारखाना बचाव कृती समितीनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. बचाव कृती समितीचे अरुण कडू, अजित कदम, अमृत धुमाळ, पंढू तात्या पवार यांनीही पॅनल तयार केला आहे. दरम्यान, कारखान्याच्या मुद्यावर बचावात्मक पावित्रा घेणार्या तनपुरे गटाने ऐनवेळी निर्णय घेत आपणही तनपुरे कारखान्याचे भले करू असा चंग बांधला. तनपुरे गटाच्या वतीने बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी सारथी होत तनपुरे समर्थकांना बळ दिले. त्यानुसार तनपुरे गटाकडूनही पॅनलची तयारी पूर्ण झाल्याचे दिसत आहे.
तनपुरे कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. सभासद, कामगारांची देणी थकीत आहे. तनपुरे कारखान्यावर सत्ता भोगणार्या संचालक व प्रशासक मंडळाने वेळोवेळी जमिन विक्री करून कारखान्याचा कारभार हाकण्याचा प्रयत्न केला. परंतू जमिन विक्री करूनही कर्ज कमी झाले नाही. कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्ती आली. कारखान्याची इमारतीसह वसाहतीच्या समस्या वाढल्या. अनेक चोरट्यांनी कारखान्याच्या मालमत्तेवर डल्ला मारला. अशा अवस्थेत कारखान्याला पुर्ववैभव मिळवून देणे मोठे आव्हानात्मक ठरणारे आहे. निवडणूक झाल्यास पुन्हा सत्ताधारी व विरोधक संघर्षात कारखान्याचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषक कारखाना निवडणूक बिनविरोध झाली तरच कारखान्याचे भले होईल असे सांगत आहे. बिनविरोधाची चर्चा धुसर असताना ऐन रणरणत्या उन्हात राहुरीचे राजकारण चांगलेच तापले आहे.
तनपुरे कारखान्यासाठी 180 उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहे. 16 मे पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. बिनविरोधाचा निर्णय झाल्यास अर्ज माघारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेक भावी संचालकांची मनधरणी करावी लागणार आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार असल्याने बिनविरोधाचा प्रस्ताव मान्य होणार का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.