Ahilyanagar : संगमनेर तालुक्यात पेटले ‘निळवंडे’चे पाणी; कालव्यातून पाइप काढण्यावरून पोलिस-शेतकरी आमनेसामने

जलसमाधी घेण्याचा शेतकर्‍यांचा इशारा ; अधिकारी-शेतकरी-पोलिसांचा दिवसभर पाठशिवणीचा खेळ
Ahilyanagar
‘निळवंडे’चे पाणीPudhari
Published on
Updated on

Nilwande Dam Water :

संगमनेर : निळवंडेच्या पाण्यावरून रविवारी (दि. 4) संगमनेरातील वातावरण चांगलेच तापले. निमगाव बुद्रुक येथे रणरणत्या उन्हात शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. यामुळे राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांसह निळवंडे उजव्या कालव्याचे उपविभागीय अभियंता प्रमोद माने व अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व शेतकरी आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. सायंकाळी कोळवाडे पिंपरणे परिसरातही पोलिस व शेतकरी संघर्ष सुरू होता. या ठिकाणचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, आम्हाला गोळ्या घाला, मग कालव्यातील पाइप काढा, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला.

निळवंडे धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून 23 एप्रिलपासून शेतीला पाणी सुरू आहे. संगमनेरातील शेतकर्‍यांनी कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाइप काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लाभधारक शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने आल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सायंकाळी कोळवाडे, पिंपरणेसह कालवा परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. येथे शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाल्याने पुन्हा पोलिस आणि शेतकरी आमनेसामने आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कालव्यातील पाईप काढण्यावरून अनेक ठिकाणी पोलिसांची व अधिकार्‍यांची बाचाबाची झाली. हा संघर्ष आता यापुढे अधिक तीव्र होणार, अशी चिन्हे सध्या निर्माण झाली असून, निळवंडेचे पाणी पेटल्याने संगमनेरसह राहुरी तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Ahilyanagar
Ahilyanagar : विशेष ग्रामसभेसाठी संपूर्ण गाव राहणार बंद! वाचा काय आहे नेमकं प्रकरण

उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यात चार्‍यांची कामे पूर्ण झालेली नसल्यामुळे शेतकर्‍यांनी कालव्यात पाइप टाकून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या कर्मचार्‍यांनी हे पाइप फोडून टाकले होते. त्या विरोधात थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यासह शेतकर्‍यांनी दोन दिवसांपूर्वी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. अखेर जलसंपदा विभागाने लेखी आश्वासन देऊन पाइप फोडणार नसल्याचे सांगितले. मात्र अवघ्या दोनच दिवसांत रविवारी अधिकारी पोलिस बळाचा वापर करीत निमगाव बुद्रुक येथे दाखल झाले. यामुळे शेतकरीही मोठ्या संख्येने जमा झाले. अधिकारी, शेतकरी व पोलिस आमनेसामने आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. आक्रमक शेतकरी व जलसंपदा अधिकार्‍यांची बाचाबाची झाली.

शेतकर्‍यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, राहुरी तालुक्यात कालव्यांचे क्षेत्र 16 किलोमीटर आहे. त्यासाठी वीस दिवस पाणी दिले जाणार आहे. संगमनेर तालुक्यात 48 किलोमीटरचे क्षेत्र आहे. साठ दिवस पाणी देणार का? अधिकार्‍यांनी वीस दिवस पाणी देऊ असे सांगितले. यामुळे शेतकरी संतप्त झाले. निळवंडे धरण आणि कालव्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व जनतेने पुढाकार घेतला. स्वतःच्या जमिनी दिल्या, नागरिकांचे पुनर्वसन करून घेण्यात हातभार लावला. त्या पाण्यावर नैसर्गिकरित्या पहिला हक्क संगमनेरचा आहे, त्यांच्यावर अन्याय तुम्ही नेमका कोणाच्या सांगण्यावरून करत आहात? असाही सवाल शेतकर्‍यांनी केला.

कालवा परिसरात राज्य राखीव पोलिस दलासह पोलिस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या नेतृत्वात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Ahilyanagar
School Leaving Certificate : शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी पालकांची अडवणूक

अनधिकृत उपसा करू नये जलसंपदाचे आवाहन; पुरेशा पाण्याचे नियोजन

ऊर्ध्व प्रवरा (निळवंडे 2) प्रकल्पाच्या उजव्या कालव्यामधून पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत असून, संगमनेर व राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसे पाणी मिळेल, याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी कालव्यात अनधिकृतपणे पाइप टाकून उपसा करू नये, असे आवाहन ऊर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी केले आहे.

हापसे यांनी म्हटले आहे, की पाण्याचे नियोजन करताना बंधारे, के.टी.वेअर व पाझर तलाव भरून प्रत्येक शेतकर्‍याला समान पाणी मिळावे यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. प्रथम टप्प्यात राहुरी तालुक्यातील गावांना 17 मे 2025 पर्यंत आवर्तन देण्यात येणार असून, त्यानंतर 18 मेपासून संगमनेर तालुक्यातील गावांना पाणी देण्यात येणार आहे. मात्र 1 मे रोजी संगमनेर तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी उजव्या कालव्यात नियोजनाविना पाइप टाकल्याने राहुरी तालुक्यात जाणार्‍या पाण्याला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे प्रशासनास पोलिसांची मदत घ्यावी लागली.

संगमनेर व राहुरीतील शेतकर्‍यांना पुरेसे पाणी मिळेल. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे आणि विभागाच्या नियोजनात अडथळा आणू नये, असे आवाहन हापसे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news