

नगर : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण गणलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. थोरात कारखान्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे 133 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी माघारीपर्यंत 21 जागांसाठी 21 अर्ज राहिले. विखे पाटील कारखान्याच्या 21 जागांसाठी 21 अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (दि.29) दोन्ही कारखान्यांच्या 21 जागांसाठी 21 अर्ज शिल्लक राहिल्यामुळे या दोन्ही साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विखे पाटील कारखान्यावर तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थोरात कारखान्यावर आपलेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिध्द केले आहे
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 29) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यापूर्वीच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने सर्व 21 जागांवरील उमेदवार बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. या कारखान्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
थोरात कारखाना निवडणुकीसाठी अनेकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चुरशीची होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, विरोधकांनी अचानक माघार घेतल्याने निवडणूक एकतर्फी झाली. बाळासाहेब थोरात यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
अर्ज माघारीसाठी 29 एप्रिलपर्यंत मुदत होती. मात्र, त्यापूर्वीच वीस जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले होते. केवळ धांदरफळ गटातून एका उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने ही प्रक्रिया रखडली होती. माजी संचालक रमेश गुंजाळ यांनी शुक्रवारी (दि. 25) दोन्ही अर्ज माघारी घेतल्याने या गटातून विजय रहाणे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे थोरात कारखाना निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी बिनविरोध झाली.
या कारखाना निवडणुकीत तरुणांना व नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. मागील संचालक मंडळातील केवळ चौघांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागांसाठी 21 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि.29) निवडणूक बिनविरोध झाल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी अहवाल निवडणूक प्राधिकरणाला पाठविला आहे. या कारखान्याची निवडणूक चौथ्यांदा बिनविरोध झाली आहे.
पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 2025-2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी संचालकपदाची 9 मे 2025 रोजी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी राहाता येथील तहसील कार्यालयात 3 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला. या कारखान्याची निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय शेतकरी विकास मंडळाने घेतला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. 9 एप्रिल) रोजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाच्या वतीने 21 जागांसाठी 21 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (दि. 29) दाखलपैकी कोणीही अर्ज मागे घेतले नाहीत. संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 21 अर्ज असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
या नवीन संचालक मंडळात विखे घराण्यातील माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे एकमेव संचालक असणार आहेत
नवीन संचालक मंडळ
गट क्रमांक 1 : विजय काशीनाथ म्हसे (आश्वी बु.), रंगनाथ भाऊराव उंबरकर (उंबरी), अनिल सावळेराम भोसले (आश्वी खुर्द), गट क्रमांक 2 : अशोक बाबासाहेब घोलप (हणमंतगाव), गोरक्षनाथ सोपान तांबे (दाढ बुद्रूक), गट क्रमांक 3 : किरण सुधाकर दिघे (धानोरे), प्रकाश लक्ष्ण ताठे (सात्रळ) गट क्रमांक 4 : डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील (लोणी बु.), रामप्रसाद दगडू मगर (गोगलगाव), गट क्रमांक 5 : ज्ञानेश्वर रघूनाथ खर्डे (कोल्हार बु.), श्रीकांत दशरथ खर्डे (भगवतीपूर), बापूसाहेब चांगदेव कडसकर (भगवतीपूर), गट क्रमांक 6 : विजय उत्तमराव कडू (तिसगाव), सोमनाथ बाळासाहेब गोरे (राजुरी), दिलीप मुक्ताराम यादव (ममदापूर), अनुसूचित जाती : रतन देवजी कदम (चिंचपूर), ओबीसी : सोपान विठठल शिरसाठ (कोल्हार खुर्द ), भजाविज (एनटी) : बाळासाहेब चांगदेव लाटे (चिंचोली), महिला राखीव : अलकाताई संभाजी देवकर (कोल्हार बु.), हिराबाई भास्कर पाटोळे (चणेगाव). उत्पादक सहकारी संस्था (ब वर्ग) : सुनील भारत तांबे (दाढ बुद्रुक)