प्रमोद कुंभकर्ण
Ahilyanagar special gramsabha
कोल्हार : महिला व मुलींच्या सुरक्षिततेसह वाढती गुंडगिरी, राजरोस सुरू असलेला मटका व्यवसाय, अवैध दारू विक्री आदी अवैद्य धंद्यांसह कोल्हार भगवतीपूर येथील अनेक ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी आज (सोमवारी) सायंकाळी 6 वाजता येथील ग्रामदैवत भगवती माता मंदिराच्या प्रांगणात विशेष ग्रामसभा पार पडणार आहे.
दरम्यान, शनिवारी (दि.3) रोजी होणारी विशेष ग्रामसभा काही कारणास्तव रद्द झाली. यामुळे नागरिकांमध्ये उलट- सुलट चर्चेला उधाण आले होते, परंतू ग्रामसभा आज होणार असल्याचे पत्रके ग्रामस्थांना वाटण्यात आली आहेत. या ग्रामसभेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे, यासाठी सायंकाळी 5 वाजेनंतर कोल्हार भगवतीपूर गाव बंद ठेवणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
गुंडगिरी वाढून कोल्हार भगवतीपूर गावात तरुणींच्या छेडछाडीसह मुलींना फुस लावून पळून नेण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. टपोरींचा होणारा त्रास व छेडछाडीच्या वाढत्या प्रकारांवर अंकुश रहावा, या उद्देशाने कोल्हार- भगवतीपूरचे ग्रामस्थ एकवटल्याने या गंभीर व ज्वलंत प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज होणारी विशेष ग्रामसभा लक्षवेधी ठरणार आहे. यापूर्वीही गावात विशेष ग्रामसभा झाल्या. त्यावेळी अनेक मोठे निर्णय झाले, परंतू परिस्थिती मात्र जैसे- थेच राहिल्याने आज होणारी विशेष ग्रामसभा केवळ फार्स ठरवू नये, अशी कोल्हार भगवतीपुरकर ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
विशेष ग्रामसभेसाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहे. विशेष असे की, महिलांचा मोठा सहभाग, हे आजच्या ग्रामसभेचे वैशिष्ट्य असणार आहे. कोल्हार भगवतीपुरच्या नावारूपाला आलेल्या बाजारपेठेला सामाजिक अशांततेमुळे कुठेही गालबोट लागू नये, गावाचे गावपण कायमस्वरूपी टिकून रहावे, गावातील सर्व जाती-धर्माचे नागरिक एकोप्याने गुण्या- गोविंदाने रहावेत, कायमस्वरूपी शांतता, कायदा व सुव्यवस्था नांदावी, या उद्देशाने आज विशेष ग्रामसभा होणार आहे. गावातील गुंडगिरीसह अवैद्य धंदे कायमस्वरूपी हद्दपार करण्याबाबत ग्रामस्थांसह पोलिस सहकार्य करतील, अशी कोल्हार भगवतीपूरच्या नागरिकांना अपेक्षा आहे.