राहुरी: हॉटेल व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास गैरवापर होत असल्याच्या तक्रारींनंतर जिल्हा पुरवठा विभागाने अचानक तपासणी मोहीम राबविली. 35 हॉटेल्सची तपासणी करत तेथून 11 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघडकीस आले.
जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने राहुरी तालुक्यात संयुक्त कारवाई केली. अचानक करण्यात आलेल्या या छापेमारीमुळे हॉटेल चालकांमध्ये एकच खळबळ उडाली. तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती गॅस सिलिंडर वापरून स्वयंपाक सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. नियमांनुसार हॉटेल, ढाबे व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचाच वापर करणे बंधनकारक आहे. मात्र काही व्यापाऱ्यांनी घरगुती गॅसचा वापर सुरू असल्याचे उघड झाले.
शहरातील एमआयडीसी परिसरात अन्नधान्य वितरण विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत साठा उघडकीस आला असून 9 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांद्वारे विविध ठिकाणी नियमित तपासण्या सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत 59 हॉटेल्स व 6 गॅस वितरक संस्थांची तपासणी करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत एकूण 11 सिलिंडर जप्त करण्यात आले असून धाडीत ते ताब्यात घेण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी असलेले सिलिंडर अनधिकृतरीत्या साठवून ठेवणे नियमबाह्य असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागते.
ही कारवाई नगर शहराच्या अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भोवते, नगर तालुक्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी शिवराज पवार, राहुरीचे पुरवठा निरीक्षण अधिकारी सुदर्शन केदार, बीपीसीएल कंपनीचे जिल्हा समन्वय अधिकारी राजकुमार मिश्रा, नगर शहराचे पुरवठा निरीक्षक तेजस पाटील, महसूल सहाय्यक अक्षय एकशिंगे व वाहनचालक योगेश शहाणे यांच्या पथकाने केली.