नगर: जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सोमवारी शेवटची मुदत आहे. प्रस्थापितांनी एकत्र येऊन सर्वच जागांवर बिनविरोधची चाचपणी पूर्ण केली असताना, विस्थापित गटातून आज नेमके कोणाकोणाचे उमेदवारी अर्ज भरून घेतले जाणार, यावरच निवडणुकीचा ‘गेम’ ठरणार आहे. प्रस्थापितांच्या मतदारसंघातील विस्थापितांचे ‘उमेदवारी अर्ज’ पाहूनच ही निवडणूक कशी होणार, याचे संकेत मिळणार आहेत.
जिल्हा बँकेच्या 21 जागा आहेत. यामध्ये 14 तालुक्यांतून 14 जागा सोसायटी मतदारसंघातून येणार आहेत. दोन महिला, एक शेतीपूरक, एक बिगरशेती, एक ओबीसी, एक भटक्या विमुक्त अन् एक जागा अनुसूचित जाती जमातीतून असेल. सोमवारअखेरपर्यंत भरलेल्या अर्जांची छाननी मंगळवारी होणार आहे.
प्रस्थापितांचे संभाव्य गणित
सोसायटीच्या 14 जागांसाठी प्रस्थापिंतांनी ठरविलेले संभाव्य उमेदवार...
अकोले - संजीवनी शिंदे (सीताराम गायकर यांची कन्या) किवा कैलास वाकचौरे,
कोपरगाव - विवेक कोल्हे
राहाता - डॉ. सुजय विखे पाटील
श्रीरामपूर - करण ससाणे
राहुरी - आमदार प्राजक्त तनपुरे
नेवासा - शंकरराव गडाख
शेवगाव - राजश्री चंद्रशेखर घुले
पाथर्डी - आमदार मोनिका राजळे
नगर - आमदार अक्षय कर्डिले
पारनेर - गीतांजली शेळके (सुजय विखे ठरवतील तो उमेदवार)
श्रीगोंदा - प्रतापसिंह पाचपुते
संगमनेर आणि कर्जत-जामखेडसाठी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या.
इतर सात जागांसाठी...
माजी खासदार स्व. दादापाटील शेळके यांचे नातू अंकुश शेळके किंवा जागांच्या सरका-सरकीत ऐन वेळी ससाणे, गायकवाड किंवा अन्य नाव
शेतीपूरक - आमदार आशुतोष काळे
अनुसूचित जमाती - माजी आमदार वैभव पिचड
बिगरशेती - सचिन जगताप
महिला राखीव - अनुराधा नागवडे, मंजूषा गुंड किंवा अन्य
भटक्या-विमुक्त जाती जमाती - पुन्हा संगमनेर किंवा पाथर्डीची चर्चा.
विस्थापित आज खोलणार पत्ते?
प्रस्थापितांच्या बैठकांमधून कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार असणार, हे जवळजवळ निश्चित आहे. त्यावरून, विस्थापितांची तयारी सुरू आहे. त्यासाठी पारनेर सोसायटीतून स्वतः खासदार नीलेश लंके, श्रीगोंदा माजी आमदार राहुल जगताप, अकोल्यातून आमदार किरण लहामटे, शेवगावातून अरुण मुंडे, पाथर्डीतून कडूचंद शेटे, विमुक्त जाती जमातीतून ऋषिकेश प्रताप ढाकणे, अहिल्यानगरमधून प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ ही नावे चर्चेत आहेत. कर्जत-जामखेडमध्ये विरोधकही तेथून उमेदवार देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे समजते. मात्र, संगमनेर, कोपरगाव, राहाता, नेवासा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, नगर या प्रस्थापितांच्या नऊ तालुक्यांत विस्थापितांची ‘सक्षम’ उमेदवाराची शोधाशोध सुरू दिसली.
उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना लॉटरी?
जिल्हा बँकेसाठी आतापर्यंत 110 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. एकूण 846 अर्जांची विक्री झाली आहे. यात सामान्य मतदारांनीही उमेदवारी अर्ज विकत नेत प्रस्थापित आणि विस्थापित या दोघांचे जरी जुळले तरी आता मात्र आमचा विचार करायलाच हवा, यासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय अनेकांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे शेवटच्या दिवशी सोमवारी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडू शकतो. यातून बिनविरोधच्या तडजोडीत किंवा अर्ज माघारीतही अनेकांची ‘लॉटरी’ लागू शकते, अशी चर्चा आहे.
राम शिंदे आज अर्ज भरणार!
तिसऱ्या अपत्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर असलेले विधान परिषद सभापती राम शिंदे आज सोमवारी दुपारी 1 वाजता कार्यकर्त्यांसह येऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समजली. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह शंकरराव गडाख, विवेक कोल्हे, अक्षय कर्डिले, डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, सचिन जगताप, प्रताप पाचपुते आदींचे अर्जही दाखल होणार आहेत.
‘बार्गेनिंग पॉवर’ कोणाकडे..
सोमवारी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला जास्तीत जास्त अर्ज भरता आले तरच बिनविरोधच्या चर्चेत त्यांची ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढणार आहे. विरोधकांना सर्व जागांवर उमेदवार मिळालेच नाहीत, तर निवडणुकीची हवा निघून जाणार आहे. सध्याही, नाइलाजाने का होईना, पण कर्जत-जामखेड वगळता (सभापती राम शिंदे) उर्वरित 19 पैकी एकही जागा सोडण्यास प्रस्थापित तयार नसल्याचे समजते. त्यामुळे विस्थापित हे विस्थापितच राहणार की बिनविरोधचा निर्णय आपल्या हातात ठेवणार, हे आज स्पष्ट होणार आहे.
कडेकोड पोलिस बंदोबस्त तैनात
सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दुपारी 3 पर्यंत कार्यालयात असलेल्या इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बाहेर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस असतील. याशिवाय इच्छुक आणि कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता कडेकोड बंदोबस्तही ठेवण्यात आल्याचे समजले.