नगर तालुका : छत्रपती संभाजीनगर महामार्गाची नगर तालुक्यातील धनगरवाडी शिवारात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे वाहनचालक व मालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. महामार्गाची दुरुस्ती सलगपणे न करता धनगरवाडी शिवारात दुरुस्तीचे काम रेंगाळले होते. या परिसरात वाहन चालवणे अवघड झाले होते. धनगरवाडी शिवारातील एक किलोमीटर लांबीच्या महामार्गाची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.
गुरुवार ( दि.11) रोजी धनगरवाडी शिवारात महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले.
गेल्या सहा महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर महामार्गाची दयनीय अवस्था झाली होती. त्यातच मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वळविण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याची खूपच दुरवस्था झाली. खड्डे बुजविताना सलगपणे खड्डे बुजविण्यात आले नाहीत. काही पट्टे सोडून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. धनगरवाडी शिवारात महामार्गावरून दुचाकी चालवणे अवघड झाले होते. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे धनगरवाडी शिवारातील महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती.
गुरुवारी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील धनगरवाडी शिवारात खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असले तरी इतर ठिकाणी असलेल्या खड्ड्यांचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तसेच संपूर्ण महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.