नगर: अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील कमिन्स कंपनीतील ६५ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या या कामगारांनी पुन्हा कामावर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी सोमवार (दि. २)पासून कुटुंबीयांसह कंपनीच्या प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले आहे.
संबंधित कंपनीचा ठेका नव्याने एमआरसी कंपनीने घेतल्यानंतर जुन्या कामगारांना तीन महिने कामावर ठेवण्यात आले. त्यानंतर अचानक उद्यापासून कामावर येऊ नका, असे तोंडी सांगण्यात आले. कोणतीही लेखी नोटीस किंवा पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. तसेच त्यांच्या जागी नवीन कामगारांना रुजू करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणी कामगारांनी येथील कामगार आयुक्त कार्यालयात लेखी निवेदन दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून सुनावणीच्या तारखा मिळत आहेत. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. कामगार आयुक्तांनी कंपनी व्यवस्थापन व एमआरसी कंपनीच्या प्रतिनिधींना कामगारांना पुन्हा रुजू करून घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
६५ कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांचे कुटुंबीयही आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत कामगारांना पुन्हा कामावर घेतले जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, असा ठाम पवित्रा कामगारांनी घेतला आहे. या आंदोलनाकडे कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे.