नगर: जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सिस्पे घोटाळ्यासह आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, अनधिकृत कत्तलखाने, ड्रग्ज तस्करी व अवैध धंद्यांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चिंतेची बाब बनल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. त्यासाठी स्मार्ट पोलिसिंग करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पालकमंत्री विखे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यातील बैठकीनंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप केवळ स्थानिक मर्यादेत राहिलेले नाही. सिस्पे घोटाळ्यासह अनेक आर्थिक गैरव्यवहारांचे धागेदोरे मोठ्या नेटवर्कशी जोडलेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी ठोस मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस नगरमध्ये प्रचारासाठी येत असून, त्यांच्या समोर हा विषय मांडला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांवर त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे, असे सांगताना त्यांनी प्रवरा आणि गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाकडेही लक्ष वेधले. महसूल व पोलिस यंत्रणा असूनही खुलेआम सुरू असलेला वाळू उपसा हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात ड्रग्जचे प्रमाण वाढत चालले असून, त्यातून तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोपही विखे पाटील यांनी केला. ड्रग्ज, अवैध दारू, जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कळित होत आहे. पोलिसिंग कमी पडत आहे. गस्त, तपास आणि प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
गुन्हेगारीचा आढावा
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी क्राईम मिटिंग घेत जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, तणावाच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिका निवडणुकीतील प्रत्येक प्रचार फेरीचे स्वतंत्र चित्रीकरण करण्यात येणार आहे. निवडणूक संदर्भातील प्रत्येक तक्रार, अदखलपात्र गुन्ह्यांची तातडीने नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवणार असून गृहरक्षक दलाचे जवान आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले.