चिंचपूर पांगूळ: पाथर्डी तालुक्यातील वडगाव आणि ढाकणवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध विकासकामांचा आणि स्वच्छतेचा जागर करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतर्फे हे विशेष अभियान राबवण्यात आले.
या अभियानांतर्गत वडगाव येथील स्मशानभूमी परिसर, मठाची जागा, जिल्हा परिषद शाळा आणि यशोदा माता विद्यालय परिसरात महाश्रमदान करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आंबा, नारळ आणि चिकू अशा एकूण 150 फळझाडांच्या रोपांचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रोपण करण्यात आले. केवळ वृक्षारोपणच नाही, तर या रोपांच्या संवर्धनाचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या वेळी ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करण्यात आला. तसेच, गावामध्ये जनजागृती फेरी काढून प्लास्टिक मुक्त गावाचा संदेश देण्यात आला. संपूर्ण गावातून प्लास्टिक आणि कचरा संकलन करून परिसर चकाचक करण्यात आला.
या वेळी सरपंच आदिनाथ बडे, डॉ. राजेंद्र खेडकर, आजीनाथ बडे, ग्रामपंचायत सदस्य शीतल संभाजी नागरगोजे, रवींद्र ढाकणे, शेळके तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास आघाव, हनुमंत खेडकर, गोपीचंद रोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मोहिमेत सर्व ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, बचत गटाच्या महिला आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. स्वागत आणि आभार ग्रामविकास अधिकारी रोहिदास आघाव यांनी केले.