Ahilyanagar Drought Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Drought: ‘साहेब, आता तुम्हीच आमचे देव!’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची आर्त हाक

केंद्रीय पथकासमोर हेक्टरी ५० हजारांच्या नुकसानभरपाईची मागणी; पिके करपली, तलाव आटले, चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: काळ्या आईच्या कुशीतून सोने पिकवणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांत आज अश्रू आहेत. काही महिन्यांपूर्वी शेतात जी हिरवीगार पिके डोलत होती, ती पिके आज करपली आहेत. फळबागा सुकल्या आहेत. तलाव कोरडे पडले आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर शेतकऱ्यांनी व्यथा मांडताना, “साहेब, होत्याचं नव्हतं झालं हो! आता तुम्हीच आमचे देव आहात!” अशा शब्दांत मदतीसाठी आर्त साद घातली. पथकातील काही अधिकारीही नुकसान आणि दुष्काळी स्थितीची तीव्रता पाहून हेलावले.

खरीप हंगामातील पावसाची कमतरता आणि दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी कर्जत तालुक्यात दाखल झाले. टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात, माही जळगाव आणि वालवड शिवारात पथकाने पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिकांचे नुकसान, फळबागांची अवस्था आणि पशुधनासाठी चाऱ्याची परिस्थिती यांचा आढावा घेण्यात आला.

कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. के. पुन्नुस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अहिल्यानगर-पुणे पथकात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश होता. मुंबई पथकातील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल, राष्ट्रीय सहकारी अन्नधान्य महासंघाचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंह आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया, नागपूर पथकातील निरीक्षण संचालनालयाचे संचालक अर्जेश कुमार माधोक, कृषि आयुक्त सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांत नितीन पाटील, तहसीलदार रवी सतवन, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.किरण पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रघु आबा काळदाते, बाळासाहेब सपकाळ, उपसरपंच गणेश काळदाते, माजी सरपंच डॉ. सागर ढोबे, भाजपचे सरचिटणीस नंदलाल काळदाते आदी उपस्थित होते.

केंद्रीय समितीने तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी, चिंचोली, वालवड व रेहकुरी या परिसरात पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रघुआबा काळदाते यांनी यावेळी यंदा केवळ ३० टक्के पाऊस झाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.

ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या निकषांमध्ये बदलाची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांनी केली. १९९० च्या दशकात निश्चित केलेल्या प्रतिव्यक्ती २० लिटर पाण्याच्या निकषाचा फेरविचार करावा, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांना चारा छावण्या, चारा डेपो किंवा थेट खात्यात आर्थिक मदत अशा कोणत्याही स्वरूपात मदत द्यावी; मात्र ती तातडीने पोहोचवावी, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. अच्युतराव काळदाते, गणेश काळदाते, बाळासाहेब सपकाळ नंदलाल काळदाते यांनीही पथकासमोर विविध सूचना मांडल्या.

पाहणी संपेल; संकट कधी संपणार?

केंद्रीय पथकाची पाहणी संपेल. शेतकऱ्यांसमोरील संकट कधी संपणार, असा सवालही या वेळी उपस्थित झाला. शेतकऱ्यांना आता केवळ पाहणी नको, तर प्रत्यक्ष मदत हवी आहे. नुकसानभरपाई, चारा-पाणी, वीजबिल माफी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबत ठोस निर्णय होण्याची प्रतीक्षा आहे, अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली. काळ्या आईच्या कुशीत घाम गाळणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांतील अश्रू कसे पुसले जातात, यावरच या पाहणीचे खरे फलित अवलंबून आहे.

निमगाव वाघाचा तलाव आटला

अहिल्यानगर तालुक्यातही केंद्रीय पथकाने पाहमी केली. चास येथे सोयाबीन, बाजरी आणि कांदा या पिकांची पाहणी केली. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशा मावळल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. निमगाव वाघा येथे देवी तलावाची पाहणी करण्यात आली. या तलावाच्या पाण्यावर परिसरातील मोठ्या प्रमाणात शेती अवलंबून आहे. मात्र, तलावात पुरेसा पाणीसाठा नसल्याने यंदा पिके घेणेही कठीण झाले आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा आणि पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT