

नगर: दुष्काळी पाहणी दौर्यावरील केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले असून, शुक्रवारी (दि.९) जिल्ह्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. तीन सदस्यीय पथकांच्या माध्यमातून नगर तालुक्यातील चास, कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात व वालवड-रेहेकुरी या चार गावांतील होरपळलेल्या पिकांची आणि फळबागांची पाहणी करणार आहे.
या चार गावांची पाहणी करुन हे पथक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहेत. दरम्यान, ऐनवेळी पाहणी दौर्यातील गावांत बदल होण्याची शक्यता आहे.
राज्यातील दुष्काळी परिजस्थतीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक राज्य दौर्यावर येत आहे. या पथकातील केंद्रीय पीक विभागाचे संचालक डॉ. के.पुन्नास्वामी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम अहिल्यानगर जिल्हातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहे.
या टीममध्ये केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा व सॅनिटेशन विभागाचे अधिकारी अबसर अहमद खान, तसेच अन्न व पीडी विभागाचे संचालक सुमीत शर्मा या दोन वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. हे तीन सदस्यीय पथक गुरुवारी (दि.८) रात्री अहिल्यानगरात मुक्कामी दाखल झाले आहे.
शुक्रवारी (दि.९) सकाळी या पथकातील अधिकारी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन, सकाळी ९ वाजता जिल्हा दौर्यास प्रारंभ करणार आहेत. शासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविलेल्या दौर्यानुसार हे पथक नगर तालुक्यातील चास गावात सोयाबीन, बाजरी आणि तूर पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
त्यानंतर हे पथक कर्जत तालुक्यातील प्रथम जाणार आहे. या तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील बाजरी व तूर, चिंचोली काळदात येथील सीताफळ, तूर व डाळिंबांची पाहणी करणार आहे.
दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास हे पथक वालवड येथील मका पिकाच्या नुकसानीची पाहणी करणार आहे. त्यानंतर १ वाजता हेपथक रेहकुरी येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी, कृषी, पाणीपुरवठा व इतर विभागांची दुष्काळाबाबतची परिस्थिती जाणून घेणार आहेत. त्यानंतर हे केंद्रीय पथक करमाळामार्गे सोलापूरला रवाना होणार आहे.
या पथकाच्या दौर्याचे नियोजन करण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी दादासाहेब गिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.वीरेंद्र बडदे आदी परिश्रम घेत आहेत.