

कोपरगावः कोपरगाव शहरावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे सावट ओढवले आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पुढील पाणी आवर्तन उशिराने येणार असल्याची माहिती नाशिक पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले आहे. ९ ऑक्टोबरपासून शहरात ६ दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती पालिका अधिकारी अजित निकत यांनी दिली.
पाटबंधारे विभागाकडून पुढील आवर्तन उशिराने सोडण्यात येणार असल्याने उपलब्ध पाणीसाठा पुढील आवर्तनापर्यंत पुरविण्याचे आव्हान आता नगरपरिषदेसमोर आहे. अशातच कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने जलसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
शहरातील नागरिकांनी परिसरातील विंधन विहिरीतील उपलब्ध पाण्याचा आवश्यकतेनुसार वापर करून, नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक थेंब महत्त्वाचा
नळ विनाकारण सुरू ठेवू नये. आवश्यकतेपुरताच पाण्याचा वापर करावा. अंघोळीसाठी कमी पाणी वापरावे. वाहने धुण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा. बागकामासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अशा सूचना नगरपरिषदेने केल्या आहेत.
‘पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पाणी वाचवा... भविष्य वाचवा’ असा संदेश देत नागरिकांनी पाणी बचतीच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेने केले आहे.
ऐन सणासुदीत संकट
ऐन सणासुदीसह नवरात्र उत्सवात दुष्काळाच्या सावटाखाली कोपरगावात पाण्याचे गडद संकट उभे राहिले आहे. यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाच साठवण तलावांत किती पाणीसाठा...
सद्यस्थितीत कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाच साठवण तलावांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा शिल्लक आहे. तलावनिहाय पाणीसाठा फुटांमध्ये असा; तलाव क्र. १ - ५.५ फूट, तलाव क्र. २- ४ फूट,
तलाव क्र. ३- ६ फूट, तलाव क्र. ४- १० फूट, तलाव क्र. ५- १५ फूट असा असून, एकूण पाच तलावांमधील नोंदविलेली पाण्याची उंची : ४०.५ फूट आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे लिपिक स्वप्निल जाधव यांनी दिली.