नगर तालुका: अहिल्यानगरपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बुरुडगाव येथील सीना नदीवरील पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जय माता दि उद्योग समूहाचे नवनाथ विठ्ठल वाघ यांनी स्वखर्चातून ही आकर्षक रोषणाई केली आहे.
रात्रीच्या वेळी ही विद्युत रोषणाई अत्यंत मनमोहक दिसते. रामसेतू पुलावरील या विद्युत रोषणाईची तरुणाई मध्ये क्रेझ दिसत आहे. अनेक हौशी मंडळीं खास फोटो सेशन साठी या ठिकाणी भेट देत आहेत.
बुरुडगाव हे अहिल्यानगर तालुक्यात येत असले तरी शहराचा भाग म्हणूनच ओळखले जाते. बुरुडगाव लगत वाहणाऱ्या सीना नदीवर पूर्वीच्या काळापासून एक कमी उंचीचा पूल होता. पण काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून या ठिकाणी भव्य उंच पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या पुलाचे नामकरण रामसेतू असे करण्यात आले. या पुलावर नेत्रदीपक व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाईसोबतच या ठिकाणी विविध शिल्प ठेवण्यात आले आहेत.
गावातील प्रमुख व्यवसाय असणाऱ्या शेती आणि दूध व्यवसाय यांचे प्रतीक म्हणून दूध काढणाऱ्या शेतकऱ्याचे सुंदर शिल्प या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. तसेच मोर, बदल आणि इतर अनेक पशू,पक्ष्यांंंची शिल्प या ठिकाणी आहेत. लोकांना निवांत बसता यावे, यासाठी अनेक बाक देखील ठेवण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी येथील विद्युत रोषणाई खूपच नयनरम्य दिसते. अनेक ग्रामस्थ आणि वृद्ध मंडळी या ठिकाणी संध्याकाळी खास निवांतपणे बसण्यासाठी येतात. तसेच शहरी भागातून संध्याकाळी फिरण्यासाठी आलेली अनेक मंडळी सुद्धा या ठिकाणी आवर्जून थांबतात आणि विद्युत रोषणाई पाहतात.
आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून कित्येक वर्षांनंतर या ठिकाणी सुंदर आणि भव्य पूल झाला आहे. अनेकवेळा आम्ही फिरण्यासाठी बाहेर जातो. त्यावेळी विविध पुलावरील विद्युत रोषणाई पाहिली आहे. गावासाठी काहीतरी केले पाहिजे, या हेतूने पुलाची विद्युत रोषणाई स्वखर्चातून केली.नवनाथ विठ्ठल वाघ, जय माता दि उद्योग समूह
शहराशी संलग्न असले तरी गावपण जपण्याचा पूर्ण प्रयत्न या गावात होत आहे. गावातील मंदिरे जीर्णोद्धार , स्मशानभूमी सुशोभीकरण, नदी सुशोभीकरण, दर रविवारी ग्रामस्वच्छता असे अनेक उपक्रम गावातील तरुण मंडळींनी हाती घेतले आहेत. लोकवर्गणीमधून सुद्धा गावात विविध विकासकामे सुरू आहेत.
या भागात रोज संध्याकाळी आम्ही शहरातून फिरण्यासाठी येतो. या ठिकाणी खूपच शांतता आणि प्रसन्न वातावरण असते. पुलावरील विद्युत रोषणाई खूपच नयनरम्य आहे. या ठिकाणी बसले की दिवसभराचा थकवा दूर होऊन जातो.मयूर धाडगे, शिक्षक, अहिल्यानगर