Fake Documents Pudhari
अहिल्यानगर

Bogus Students School Scam: बोगस विद्यार्थी दाखवणाऱ्या गुहा शाळेच्या मुख्याध्यापकांचे निलंबन

शिक्षकाचे पद वाचवण्यासाठी १३ बनावट विद्यार्थ्यांची नोंद; जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी यांची कारवाई, अन्य आठ मुख्याध्यापकांवरही कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदे टिकवण्यासाठी बोगस विद्यार्थी बसवून आवश्यक पटसंख्या दाखविणाऱ्या गुहा शाळेचे मुख्याध्यापक अन्सार पठाण यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी तसे आदेश काढले आहेत. या संबंधित शाळेला विद्यार्थी पुरवणाऱ्या मुख्याध्यापकांवरही कारवाईची शक्यता आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या कमी झाल्यास शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरू शकतात. राहुरी तालुक्यातील गुहा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांनी एका शिक्षकाचे पद कमी होऊ नये, यासाठी गतवर्षी साधारणतः 13 बोगस विद्यार्थी दाखवले. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली. त्याची चौकशी झाली.

त्यामध्ये अन्सार पठाण यांनी इतर शाळांशी संगनमत करून प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थित नसताना बोगस दाखले नोंदवणे, हजेरी पत्रकावर खोटी उपस्थिती, शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना न करणे, शालेय कामकाजात हलगर्जीपणा, वरिष्ठांशी उद्धट वर्तन इत्यादी आरोपांचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी पठाण यांना सेवेतून निलंबित केले आहे.

गुहा टार्गेट; अन्य कुठेच असा प्रकार नाही का?

विद्यार्थी शाळेत हजर आहेत, मात्र त्याचे आधारकार्ड नसेल तर त्याला संच मान्यतेत बेदखल केले जाते. विद्यार्थ्याची संख्या कमी झाली तर शिक्षकाचे पद कमी होते. फक्त गुहाच्या मुख्याध्यापकांना टार्गेट करण्यासाठी हा प्रकार पुढे आणला गेला, जिल्ह्यात असे प्रकार अन्य कुठे नाहीतच का, याचे सीईओंनी उत्तर द्यावे, असा प्रश्न एका शिक्षक नेत्याने केला आहे.

त्या मुख्याध्यापकांना अभय का?

गुहा शाळेत बोगस विद्यार्थी दाखवल्याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यांना संगनमताने आपल्या शाळेतून विद्यार्थी देणाऱ्या ‘त्या’ आठ मुख्याध्यापकांना सीईओंकडून अभय दिले जात आहे का, असा सवाल आता पुढे केला जात आहे. असे घडल्यास पुन्हा अशा प्रकारे विद्यार्थी देवाणघेवाण ‘अधिकृत’ होण्याची भीती आहे. त्यामुळे या साखळीत सहभागी असणाऱ्या इतर मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT