बोधेगाव: भारतीय कापूस महामंडळातर्फे शेवगाव व बालमटाकळी येथील कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, शनिवारी (दि. 27) केंद्र निवडण्यासाठीची ऑनलाईन यंत्रणा अचानक बंद पडल्याने संपूर्ण योजनेचा बोजवारा उडाला असून, दिवसभर ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शहरात चार, तर बालमटाकळी येथील खासगी जिनिंगमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरू आहे. केंद्रावर एकाच वेळी गर्दी व गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सरकारने ऑनलाईन नोंदणीद्वारे कापूस खरेदीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय कापूस महामंडळाच्या अपुऱ्या नियोजनामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र दिसून आले.
शनिवारी सकाळी 11 वा. शेवगाव येथे कापूस विक्रीसाठी खरेदी केंद्र, विक्री दिनांक व वेळ निवडण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. मात्र, ऑनलाईन प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी दुपारी 3 वा. पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे सांगितले. या आशेवर शेतकरी दिवसभर केंद्रावर थांबून राहिले. मात्र, सायंकाळपर्यंत ऑनलाइन प्रक्रिया सुरू न झाल्याने अखेर शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने घरी परतावे लागले.
महामंडळाच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिका व नियोजनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीतील त्रुटी तत्काळ दूर करून कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आठवड्यातून फक्त शनिवारीच ऑनलाईन कापूस विक्रीसाठी केंद्र निवडण्यात येत असल्याने शेवगाव येथे नोंदणीसाठी सकाळी लवकर येऊन दिवसभर उपाशीपोटी थांबूनही ऑनलाईन नोंदणी झाली नाही. अखेर मोकळ्या हाताने घरी परतावे लागले.बाबासाहेब लोंढे, शेतकरी, मजले शहर
आज ऑनलाईन पद्धतीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने कापूस विक्रीसाठी केंद्र निवडण्यासाठी उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे स्वतंत्रपणे नोंदविण्यात आली आहेत. या शेतकऱ्यांना येत्या काळात कापूस विक्रीसाठी प्राधान्याने संधी देण्यात येईल.नानासाहेब मडके, सभापती, बाजार समिती, शेवगाव