नगर: भिंगार येथील नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीला अखेर यश आले असून, अहिल्यानगर कॅन्टोन्मेट बोर्ड कार्यक्षेत्रात आता दोन ‘एफएसआय’ला (चटई क्षेत्र) मंजुरी मिळाली आहे. याबाबत संरक्षण खात्याने नुकतीच सुधारित राजपत्रात अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे बांधकामाच्या मर्यादांमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या भिंगारच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार असून, हजारो मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे.
अहिल्यानगर कॅन्टोन्मेट बोर्ड कार्यक्षेत्रात आतापर्यंत केवळ १ एफएसआय (चटईक्षेत्र) लागू असल्याने उपलब्ध जागेवर बांधकाम करण्यावर मर्यादा होत्या. परिणामी वाढत्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या मर्यादेमुळे वाढीव बांधकाम करता येत नसे. अशा विविध अडचणींमुळे बर्याच कुटुंबांना भिंगार शहराबाहेर स्थलांतर करावे लागले. मात्र, आता एफएसआय दुप्पट झाल्याने स्वतःच्याच जागेत गरजेनुसार अधिकचे बांधकाम करण्याचा तसेच बहुमजली इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भिंगार परिसरात वाढीव एफएसआयच्या मागणीसाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सातत्याने संरक्षण विभागाकडे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनीदेखील शासनदरबारी पाठपुरावा केला. याशिवाय भिंगार येथील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, संघटना आदींनी संबंधित विभागाला निवेदने दिली. आंदोलनेही केली होती. दोन वर्षांपूर्वी बोर्डाचे तत्कालीन मुख्याधिकारी मोरे आणि नामनिर्देशित सदस्य वसंत राठोड यांनी बिल्डिंग बायलॉजमध्ये बदल करण्याचा ठराव पारित करत एफएसआय वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.
लोकसभेत केला होता प्रश्न उपस्थित
‘कॅन्टोन्मेट’च्या नियमांमुळे भिंगारमधील २५ हजार नागरिकांना एफएसआय, बांधकामासाठी आवश्यक परवानगी आणि इतर विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी लोकसभेत उपस्थित केला होता. भिंगार क्षेत्र अहिल्यानगर महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रियाही तातडीने पूर्ण करण्याची मागणीही डॉ. विखे पाटील यांनी संरक्षण मंत्रालयाकडे केली होती.
देशातील दुसरे कॅन्टोन्मेट
भिंगार शहर आणि सदरबाजार कॅन्टोन्मेट क्षेत्राला पूर्वी १ चटईक्षेत्र होते. आता दोन चटईक्षेत्र मंजूर झाले आहे. बंगलो एरिया व आऊटसाईड एरियासाठी या दोन्ही ठिकाणी ०.५ एफएसआय होता. आता या ठिकाणी एक ‘एफएसआय’ला मंजुरी मिळाली आहे. चटईक्षेत्रात वाढ होणारे हे देशातील दुसरे कॅन्टोन्मेट असल्याचे सदस्य वसंत राठोड यांनी म्हटले.