अकोले: निसर्गाच्या रंग बदलाची साक्ष सध्या भंडारदरा, रंधा, गुहिरे, कातळापुर, वाकी परिसरात पावलोपावली दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागताच निसर्गाने जणू केशरी लाल रंगांची उधळण केली आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जाणारा पळस सध्या पूर्ण बहरात असून, रस्ते, माळराने, शिवार आणि डोंगरकडा या केशरी लाल फुलांनी उजळून निघाल्या आहेत.
शिशिरातील पानगळीनंतर पानांविना फुलांनी डवरलेला पळस वनफुलांचा राजा म्हणून आपली ओळख सार्थ ठरवत आहे. तापमानात वाढ होताच अनेक वृक्षांची पानझड सुरू झाली आहे. मात्र, अशा शुष्क वातावरणातही पळस मात्र टपोऱ्या कळ्यांनी आणि गडद केशरी लाल फुलांनी बहरला आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि संध्याकाळच्या मावळत्या प्रकाशात या फुलांचा झगमगाट अधिकच खुलून दिसतो. अनेक ठिकाणी झाडाखाली गळून पडलेल्या फुलांमुळे जणू निसर्गाने जमिनीवर केशरी लाल गालिचाच अंथरला आहे, असा भास होतो. हे मनमोहक दृश्य टिपण्यासाठी निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांची पर्यटक स्थळ असलेल्या भंडारदरा धरण व रंधा धबधबा, माळेगाव, तेरुगण, बारी, चिंचोडी, पांजरे परिसरात गर्दी होताना दिसत आहे.
आरोग्यदायी महत्त्व
मराठीत पळसाला पाने तीनच ही म्हण प्रचलित आहे, ती याच वृक्षाच्या पानांच्या विशिष्ट रचनेवरून पडली आहे. पळस ही केवळ एक शोभिवंत वनस्पती नसून ती अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती आहे. पळसाची पाने तळ हाताएवढी रुंद आणि जाड असतात. ग्रामीण भागात आजही शुभकार्यात जेवणासाठी पळसाच्या पानांच्या पत्रावळी आणि द्रोण वापरण्याची परंपरा टिकून आहे.
औषधी गुणधर्म, धार्मिक वारसा
रंगपंचमीसाठी पळसाच्या पूर्वीच्या काळी होळी आणि फुलांना पाण्यात उकळून नैसर्गिक केशरी रंग तयार केला जात असे. हा रंग त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यदायी असतो. तसेच बदलत्या काळानुसार रासायनिक रंगांचा वापर वाढला असला, तरी भंडारदरा परिसरातील दुर्गम भागात आजही अनेक जण पळसाच्या फुलांपासूनच रंग तयार करण्यास प्राधान्य देतात.
फाल्गुन, चैत्र अणि वैशाख हे तीन महिने म्हणजे वसंत ऋतूच्या अनेकानेक रंगानी नटलेले. प्रखर उन्हाने तापलेले. यातला चैत्र म्हणजे वसंताचा खराखुरा सखा. वसंताच्या नावातच एक जादू आहे. त्याच्या स्वागतासाठी अगणित पुष्पमंडळं फुलून येतात. इवलाल्या नाजूक कोमल पालवीच्या पल्लावांनी झाकलेल्या पुष्पांनी डवरलेल्या वृक्ष-लतांचे दर्शन सध्या जिकडेतिकडे घडतेय. तऱ्हेतऱ्हेच्या झाडांवर पानाफुलांची ही सुकुमार शोभा किती उत्कटतेने अवतरलीय.....निसर्गाच्या विराट उद्यानात वसंतोत्सव बहरलाय. नानाविध रुप, रंग, रस, गंध आणि आकारांची फुलं लक्ष वेधून घेताहेत.भाऊसाहेब चासकर, निसर्गप्रेमी. अकोले