राजू जाधव
अकोले: भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेऊन या परिसरात गुन्हेगारी घटनाही वाढत असल्याचे दिसते आहे. गेल्या दोन वर्षात परिसरात चार अनोळखी मृतदेह आढळले, यात एक तरुणी आणि तीन पुरुषांचा समावेश होता. त्यांची ओळख अजून पटलेली नाही, त्यांच्या मुत्यूचे गूढ अजुनही उकलले नाही, तशातच नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी कुजलेले अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांचे प्रयत्न येथेही अपुरे पडले आणि तिची ओळख न पटताच ‘अनोळखी’ म्हणून तिची फाईल पुढे गेली. त्यामुळे भंडारदरा धरण परिसरातील हा टुरीस्ट स्पॉट डेथ मिस्टरी बनत चालला असून, पाचही मृत्यूंचे गूढ उकलण्यात जोपर्यंत पोलिसांना यश येत नाही, तोपर्यंत अशा गुन्हेगारीसाठी हा स्पॉट सेफझोन समजला जाण्याची भिती आहे.
भंडारदरा धरणाच्या निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंद लुटण्यासाठी बहुतांश पर्यटक हजेरी लावतात. परंतु भंडारदरा धरण, रंधा धबधबा, हरिश्चंद्रगडावरील कोकण कडा परिसरात दिवसेंदिवस बेवारस मृतदेह व आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहेत. यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी चार मृतदेह आढळले होते. पोलिसांनी आवाहन करूनही त्यांची ओळख पटली नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू हा नेमका कशाने झाला, त्यांचा अपघात झाला की कोणी त्यांना या ठिकाणी आणून घातपात केला, याचे उत्तरे मिळू शकलेली नाहीत. आता पाचवा मृतदेह सापडला.
भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मुतदेह आढळून आला, मात्र तिचे नाव, गाव, पत्ता किंवा ओळखीबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. राजूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किशोर पवार यांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आसपासच्या परिसरात चौकशी, विविध माध्यमांतून माहिती प्रसारित करूनही कोणतीही ओळखीची व्यक्ती पुढे आली नाही. अंदाजे 25 ते 30 वयोगटातील ही तरुणी मृत्यू होऊनही अनोळखी राहिली आणि मृत्यूनंतरही बेवारस ठरली.
पोलिस आठवडाभर वाट पाहतात
आठवडाभर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवला जातो. या काळात पोलिस बेवारस व्यक्तीची तसेच त्याच्या नातेवाइकांची ओळख पटविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. परंतु त्यातूनही जर का संबंधित व्यक्तीची ओळख पटली नाही तर पोलिस संबंधित अनोळखी मृतदेहावर ‘बेवारस’ म्हणून अंत्यसंस्कार करतात.
तरीही ओळख पटली नाही
राजूर पोलिसांनी भंडारदरा धरण परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. परंतु त्या तरुणीचा थांगपत्ता लागेना. एवढेच नव्हे तर भंडारद-यातील(शेंडी) सर्व रहिवाशी परिसरात पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा फोटो दाखविला. नाशिक, पुणे, धुळे, सोलापूर, मुंबई परिसरात बेपत्ता असलेल्या या तरुणीबाबत माहिती मिळवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. मात्र, तरीही त्या तरुणीच्या पादत्राणे, कपड्यावरुन ओळख पटली नाही. परंतु कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या या तरुणीचा खुन कि आत्महत्या, हे शोधून काढणे राजूर पोलिस यंत्रणेपुढे आव्हान आहे.