Belwandi Gold Loot Pudhari
अहिल्यानगर

Belwandi Gold Loot Case: पाच लाखात 25 तोळे सोने देण्याचा आमिष; दोन जण 24 तासांत जेरबंद

बेलवंडी पोलिसांची वेगवान कारवाई; कोळगावात भरदिवसा लूट, आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

नगर: पाच लाखात 25 तोळे सोने देतो, असे सांगून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना बेलवंडी पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकून गजाआड केले. निजाम जलद्या काळे (रा.पारगाव,श्रीगोंदा) आणि सुयोग बाजऱ्या काळे (रा.कोळगाव,श्रीगोंदा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

कोळगाव शिवारातील सिक्रेट हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या सममोकळ्या मैदानात शनिवारी (दि.28 फेब्रुवारी) भरदिवसा लूट झाली होती. पुणे जिल्ह्यातील अविनाश दिनकर शिंदे आणि नरेंद्र ठाकूर यांना पाच लाखात 25 तोळे सोने देतो, असे सांगून त्यांना कोळगावात बोलावून घेतले. तेथे अनोळखी महिलेसह दहा ते बारा जणांनी दोघांना मारहाण करून पाच लाखाची रोकड व मोबाईल लंपास केले.

बेलवंडी पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरविली. बेलवंडी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला दिशा दिली. कोळाई मंदिर परिसरातून पोलिसांनी निजाम जलद्या काळे आणि सुयोग बाजऱ्या काळे या दोघा संशयितांना पकडले.

त्यांची झडती घेतली त्यावेळी त्यांच्याकडे रोकड मिळून आली. पोलिसी खाक्या दाखविताच त्या दोघांनी लुटीची कबुली दिली. अटकेतील दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एपीआया नंदकुमार सोनवलकर हे अधिक तपास करत आहेत.

उपनिरीक्षक पवार, हवलदार भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, शरद गांगर्डे, यश ठोंबरे, भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब शिरसागर, विनोद पवार, मच्छिंद्र बर्डे, विठ्ठल खारमाळे, कैलास शिपणकर, राजू भोर, चालक विकास सोनवणे यांच्या पथकाने अवघ्या 24 तासात हा गुन्हा उघडकीस आणला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT