Ashok Kharat Pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat Shirdi Fraud: भोंदू अशोक खरातची शिर्डीत गुंतवणूक? उद्योजकांनाही कोट्यवधींचा गंडा

तंत्र-मंत्राच्या नावाखाली लूट; जमीन फसवणूक प्रकरणात पोलिसांची चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

गोरक्ष शेजूळ

नगर: भोंदूगिरी करत कमविलेली माया अशोक खरातने शिर्डीतील हॉटेलात गुंतवणूक केल्याची चर्चा जोमात सुरू आहे. शिर्डीसह नगर आणि संगमनेरमधील उद्योजकही भोंदूच्या मायेत फसल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे. दरम्यान शिर्डीतील गोंदकर यांची जमीन फसवणूक प्रकरणाच्या अर्जावर शिर्डी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

भोंदू खरातची शिर्डीत प्रॉपर्टी चर्चेत आल्यानंतर त्याच्या तंत्रमंत्रात फसलेल्या महिलांविषयीही विविधांगी चर्चा सुरू आहे. सोशल मिडियावर व्हायरल व्हिडीओतून शिर्डी परिसरातील आठहून अधिक महिला भोंदूच्या जाळ्यात अडकल्याचीही चर्चा आहे. बडे उद्योजकही भोंदू खरातचे शिकार होते.

मुळचे शिर्डी, श्रीरामपूर आणि संगमनेर परिसरातील मात्र उद्योग व्यवसायानिमित्त बाहेर असलेल्या काही बड्या उद्योजकांना भोंदूने गंडा घातल्याची माहिती पुढे येत आहे. नवीन उद्योगासाठी शुभ जागा, शुभ दिशा, शुभ मुहूर्त सांगणे तसेच काही ठिकाणी प्रशासनाची मदत मिळवून देण्यापोटी खरातने कोट्यावधी उकळल्याची माहिती समोर येत आहे. भोंदू खरात इतक्यावरच थांबला नाही तर त्याने काही उद्योजकांना विशिष्ट राशीच्या अविवाहित तरुणीसमवेत संबंध ठेवण्यास भाग पाडले.

उद्योगपती वृद्ध असेल तर त्याच्या मुलांना हे कृत्य करण्यास भोंदू प्रवृत्त करत. नंतर काही तरुणींना तक्रारी देण्यासाठी पुढे करून प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करत त्या उद्योगपतींना लुटले, अशा अनेक बाबी शिर्डी परिसरात चर्चेच्या स्थानी आहेत.

शिर्डीतील जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी शनिवारी गोंदकर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. तपासात फसवणूक झाल्याचे समोर आल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. हा दाखल गुन्हा एसआयटी कडे वर्ग केल जाणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT