कर्जत : हिंद सेवा मंडळाच्या मिरजगाव येथील भारत विद्यालयातील सन 1989 च्या दहावी बॅचचे विद्यार्थी तब्बल 37 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरणात स्नेहमेळावा साजरा केला. विद्यालयाच्या प्रांगणात हा अविस्मरणीय गेट-टुगेदर उत्साहात पार पडला.
स्नेहमेळाव्यासाठी मुंबई, पुणे, नगर, नाशिक, जळगाव येथून-सुमारे 60 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हजेरी लावली. अनेक दशकांनंतर वर्गमित्र समोर आल्याने आनंद, उत्सुकता व जुन्या आठवणींचा भावनिक पूर अनुभवायला मिळाला. वयाच्या पन्नाशीकडे झुकलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले शालेय दिवस, बाकावरील गमतीजमती, वर्गातील मजा-मस्ती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मैत्रीची ती गोड दुनिया पुन्हा एकदा उजळून निघाली.
ढोल-ताशांच्या गजरात आगमन होताच शाळेच्या प्रांगणात जुन्या दिवसांची लगबग जाणवत होती. उपस्थित सर्व वर्गमित्रांना फेटे बांधून स्वागत करण्यात आले. मेळाव्याचे अध्यक्षस्थान हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष आणि विद्यालयाचे चेअरमन डॉ. रमेशचंद्र झरकर यांनी भूषविले.
गुरूजनांचा सत्कार हा कार्यक्रमाचा भावनिक क्षण ठरला. सेवानिवृत्त शिक्षक देवीदास राऊत, काशिनाथ मुरकुटे, सर्जेराव बावडकर, एल. डी. खेडकर, डी. के. खेतमाळस, तरंगे, सातव , भागवत चव्हाण, मुख्याध्यापक खुरांगे आदींना विद्यार्थ्यांनी सन्मानित केले. शिक्षकांना भेटून विद्यार्थी भावूक झाले; तर शिक्षकांनीही आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक केले. माधुरी झरकर यांनी आभार मानले.
माजी विद्यार्थी व उपस्थितांनी आयुष्यातील प्रवास, आलेली आव्हाने आणि मिळवलेली यशोगाथा शेअर करत अनुभवाची शिदोरी उलगडली. शालेय आयुष्यातील गंमतीजमती, मैत्रीचे क्षण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या सगळ्यांच्या आठवणींनी उपस्थितांचे मन क्षणोक्षणी भरून येत होते. दिवस कसा गेला ते कळलेही नाही!