

वांबोरी : राहुरी तालुक्यातील वांबोरी केएसबी चौक ते ग्रामपंचायत कार्यालय रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदरचं रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. उघड्या खड्ड्यांमध्ये केवळ डांबरविरहित बांधकामाची खडी टाकून, ठेकेदार खड्डे बुजविण्याचा घाट घालून, कोट्यवधीचा डांबर मलिदा लाटण्याचे काम करीत आहे. काम अतिशय निकृष्टपणे सुरू आहे. या कामाची गुणवत्ता तपासून ठेकेदाराविरुद्ध कारवाई करावी. ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकामच्या ‘त्या’ अभियंताची चौकशी करा, अशी मागणी वांबोरीकर नागरिकांमधून होत आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी वांबोरी- ब्राह्मणी रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण व खडीकरण कामासाठी सुमारे 4 कोटी रुपयांचे निविदा काढण्यात आली. यानंतर काम जोरात सुरू झाले. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम होणार, यामुळे वांबोरीसह ब्राह्मणी, चेडगाव, मोकळओहोळ, उंबरे, सोनई, ससे- गांधले वस्ती, बोरकर वस्तीवरील नागरिकांना रहदारीसाठी सुसज्ज रस्ता निर्माण होईल, असे वाटत होते, परंतू नागरिकांच्या या अपेक्षेचा हिरमोड झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
ठेकेदाराने रस्ता अतिशय निकृष्टपणे करण्याचा सपाटा लावला आहे. डांबराचा पातळ थर टाकला आहे. यामुळे अवघ्या काही महिन्यातच रस्ता पूर्णतः उखडला आहे.
रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तोच संपूर्ण रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. या रस्त्याचे काम सुरू असतानाच पडलेले खड्डे बुजवताना ठेकेदाराने पुन्हा कामातील निकृष्ट दर्जाचा कळस गाठला आहे. खड्डे बुजवताना खड्ड्यांमधील माती व धुळ काढून, डांबर मारून त्यावर डांबर मिश्रित खडीचा थर टाकुन खड्डा भरावा लागतो, परंतू ठेकेदाराने थेट बांधकामाची डांबर विरहित खडी टाकून खड्डे बुजवले. ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या राहूरी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंत्यांचेही हात डांबरात काळे झाले आहेत, असा संताप वांबोरीकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
‘वांबोरी रस्त्याच्या कामाची तपासणी झाली आहे. यामध्ये कुठलाही गैरप्रकार आढळला नाही. पुन्हा तक्रारीची शहानिशा करण्यासाठ स्वतः लक्ष घालणार आहे. ठेकेदाराला तशा सूचना देणार आहे.
अशोक होडगर,सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता, राहुरी
रस्ता कामाची सखोल चौकशी करावी. तत्काळ रस्त्याचा कामाचा दर्जा तपासावा. संबंधितांविरुद्ध कारवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांनी दिला आहे.