Akole PESA Employees Protest Pudhari
अहिल्यानगर

Akole PESA Employees Protest: पेसा कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा; अकोले पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी आदिवासी मानधन कर्मचाऱ्यांचे आंदोलन; शासन निर्णय रद्द करण्यासह आश्रमशाळांतील भोजन व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

अकोले: पेसा क्षेत्रातील स्थानिक आदिवासी मानधन तत्त्वावरील उमेदवारांना तात्काळ सेवेत कायम सामावून घेण्याबरोबरच विविध मागण्यासाठी १५ सप्टेंबरपासून अकोले पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.

पुणे येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रतिनिधी व पेसा कर्मचारी प्रतिनिधी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दि.२९ रोजी बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पेसा कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना तसेच विविध मागण्यांसाठी दि. ६ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय, अकोले येथे काढलेला पेसा जनआक्रोश मोर्चा आणि पेसा कृती समिती यांच्या वतीने आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मागण्या, पेसा कर्मचारी यांना सेवेत कायम करणे व इतर मागण्यांसाठी दि. २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर येथे केलेले १२ दिवसांचे धरणे आंदोलन या पार्श्वभूमीवर या प्रश्नांकडे शासनाचे व प्रशासनाचे तात्काळ लक्ष वेधण्यासाठी दि. १५ सप्टेंबर पासून अकोले पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

कार्यरत व कार्यमुक्त असलेल्या सर्व पेसा मानधन कर्मचारी यांना त्याच पदावर व त्याच जागी तात्काळ सेवेत कायम सामावून घ्यावे. तर दि. ५ ऑक्टोबर २०२४ व ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पेसाच्या विरोधात काढलेले शासन निर्णय तात्काळ रद्द करावेत. सदर शासन निर्णयांना कुठलाही बेस नाही तसेच जनजाती सल्लागार समिती व राज्यपाल यांच्या अधिसूचनेचा कुठलाही बेस नाही, त्यामुळे हे शासन निर्णय तात्काळ रद्द करावेत. आणि पेसा ग्रामसभा व पैसा कायद्यानुसार आदिवासी समाजाला प्राप्त असलेल्या सर्व हक्कांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी.

तसेच पेसा ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या ५ टक्के निधीमध्ये महागाई व वाढत्या गरजांचा विचार करून दरवर्षी वाढ करावी. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील घोषित केलेली ४८ गावे इको-सेंसिटिव्ह झोनमधून तात्काळ वगळावीत. कारण या ठिकाणी पेसा कायदा व ग्रामसभा यांचा कुठेही विचार केलेला नाही व संबंधित ग्रामसभा व स्थानिक आदिवासी समाजाला विचारात घेतलेले नाही. त्यामुळे सदर निर्णय तात्काळ रद्द करावा.

विद्यार्थ्यांना ताजे, सकस, पौष्टिक व सुरक्षित अन्न उपलब्ध करून द्यावे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेवण म्हणून सेंट्रल किचनच्या माध्यमातून विष खायला घालत आहे, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका ठिकाणी तयार केलेले जेवण लांब अंतरावर हजारो किलोमीटर नेले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन शासन व प्रशासनाने तात्काळ सकारात्मक कार्यवाहीसाठी पेसा आंदोलक अवंतिका कवटे, संदीप आंबेकर, वैभव डगळे, स्वप्निल धांडे, अरुण गोंदके, सोपान पेढेकर आदी आंदोलक बसले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT