KYC Pudhari
अहिल्यानगर

Akole Crop Damage Compensation: अकोलेतील 2,369 शेतकरी मदतीपासून वंचित? केवायसीअभावी 65 लाख अडकले

अतिवृष्टी नुकसानभरपाई थेट खात्यात येण्यासाठी आधार-बँक लिंक बंधनकारक; प्रशासनाचे तातडीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

अकोले: ऑक्टोबर 2025 या काळात शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल शासनाकडून 7 कोटींचे 63 लाख 54 हजार अनुदान जाहीर केले होते. यातील 65 लाख 43 हजार 800 रुपयांचे अनुदानाचे अद्याप वाटप होऊ शकलेले नाही. 2 हजार 369 शेतकऱ्यांनी खात्याची केवायसी केलेली नसल्यामुळे त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम येऊ शकली नाही. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

अकोले तालुक्यात ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा बाधितांना राज्य सरकारकडून पिक नुकसान अनुदान मदत जाहीर करण्यात आली आहे. शासन निर्णय दि. 7 डिसेंबर 2025 अन्वये, नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (डि बी टि द्वारे) जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही रक्कम विनाअडथळा प्राप्त होण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकिकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.

बँक खाते आधारशी लिंक अनिवार्य

मागील वर्षी ऑक्टोबर या काळात 29 हजार 256 शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून 7 कोटीं 63 लाख 54 हजार अनुदान जाहीर करण्यात आले. शासनाकडून मिळणारी मदत केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यातच जमा होईल. अकोले तालुक्यातील मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.

4 कोटी 61 लाख 68 हजार रुपयांचा निधी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे; परंतु 2 हजार 370 शेतकऱ्यांनी अद्याप खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा निधी जमा होऊ शकलेला नाही. ई-केवायसी नसल्याने हे खाते कायमस्वरूपी बंद असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

केवायसी करणे गरजेचे: तहसीलदार

ज्या खात्यांची केवायसी झालेली नाही. त्या खात्यात मदत मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी करून खाते अपडेट करणे आवश्यक आहे. अतिवृष्टी मदतीपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी तहसिल कार्यालय अकोले प्रशासनाने सर्व बाधितांना ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्यास आपल्या संबंधित ग्राममहसुल अधिकारी किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT