संदीप रोडे
केडगावातून थेट नगर शहराच्या लोखंडी पुलापर्यंत पसरलेल्या 17 नंबर वार्डात महायुतीकडे इच्छुकांची संख्या वाढली आहेे. शहराचा भाग समाविष्ट झाला असला तरी केडगावचा भाग असलेल्या या वार्डात काँग्रेसचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांची भूमिकाही निर्णायक असणार आहे. माजी नगरसेवक मनोज कोतकर हे याच वार्डातून तयारी करत असून त्यांच्यासोबतचे चेहरे मात्र नवीन असतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या वार्डाला शहराचा भाग नव्याने जोडल्याने आ. संग्राम जगताप यांच्या राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत दिले जात आहेत. (Latest Ahilyanagar News)
मनोज कोतकर हे भाजपात असले तरी ते राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्याशी सलोख्याचे संबंध राखून आहेत. महायुती झाल्यास या वार्डातून शिवसेनेला जागा सुटली जाणार नाही. राष्ट्रवादी आणि भाजपातच जागा वाटप होण्याची चिन्हे आहेत. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांची मैत्री पाहता या वार्डात घड्याळाचे काटे जोरात फिरतील असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात. केडगावचा बहुतांश भाग असला तरी हा वार्ड शहरालगत येऊन धडकला आहे.
अनिल शिंदे यांच्या वार्डात (15) असलेली रवीश कॉलनी आता 17 नंबर वार्डाला जोडण्यात आली आहे. रेल्वेस्टेशन, क़ायनेटिक चौक, यश ग्रँड हॉटेल भागातील नवीन परिसर या वार्डाला जोडला गेल्याने येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत दिले जात आहेत. माजी नगरसेवक संभाजी पवार हे राष्ट्रवादीकडून याच वार्डातून तयार करत आहेत. याशिवाय दत्ता खैरे, बाली बांगरे यांचीही नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.
शास्त्रीनगर, मोहिनीनगर, दूधसागर सोसायटी प्रियांका कॉलनी, सुखकर्ता कॉलनी, पाच गोडाऊन परिसर, लोंढे मळा, ताराबाग कॉलनी, साई श्रुती पार्क हा केडगावचा भाग असलेल्या वार्डात महायुतीकडे संभाव्य उमेदवारांची संख्या जास्त असली तरी नवीन चेहरे शोधलेले भानुदास कोतकर कोणता निर्णय घेणार यावर या वार्डाची गोळाबेरीज ठरणार आहे.
वार्डाची रचना अंतिम होणे तसेच आरक्षण पडणे अजून बाकी आहे. मात्र प्रारूप रचनेत फारसा फरक पडणार नाही, ही शक्यता गृहीत धरून इच्छुकांनी आतापासूनच जनसंपर्क सुरू केला आहे. मनोज कोतकर यांची उमेदवारी निश्चित असली तरी त्यांच्या जोडीला संभाव्य उमेदवार कोण असेल? याविषयी मात्र उत्सुकता असणार आहे. भाजप व राष्ट्रवादी जुन्याऐवजी नवीन चेहर्यांना संधी देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
कोतकरांचे घड्याळ की कमळ?
मनोज कोतकर हे भाजपचे असले तरी त्यांचे आ. संग्राम जगताप यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आ. जगताप यांच्यामुळेच भाजपचे असूनही मनोज कोतकर यांना महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाची संधी मिळाली होती. त्याच वेळी ते राष्ट्रवादीत जातील, अशी चर्चा रंगली, मात्र अत्यंत संयमाने राजकीय पावले टाकत कोतकर यांनी सभापती पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. आता आगामी महापालिका निवडणुकीत मनोज कोतकर भाजपचे कमळ हातात घेणार की घड्याळ बांधणार? याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.