

राशीन : नवरात्रोत्सवानिमित्त येथील श्रीजगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणार्या सर्वांना दर्शन सुलभ व्हावे तसेच ऊन, वारा, पावसापासून संरक्षण, तसेच मंडपामध्ये एचडी स्क्रीन, पिण्याच्या पाण्याची सोय, महिलांसाठी हिरकणी कक्ष इत्यादी सुविधा देण्यात येणार होत्या. मात्र उत्तर बाजूचे दर्शनरांगेचे नियोजन कोलमडल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मुख्य दरवाजातूनच प्रवेश दिला जाईल, असे जगदंबा देवी ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.(Latest Ahilyanagar News)
मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ वॉटरप्रूफ मंडप बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते. तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली 16 सप्टेंबर रोजी नियोजन बैठक घेऊन त्यामध्ये चर्चा होऊन तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडप देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्याप्रमाणे 17 सप्टेंबर रोजी सदर मंडप देण्यासाठी आलेल्या कॉन्ट्रॅक्टर व कर्मचार्यांना काम करत असताना विक्रमराजे राजेभोसले यांनी अडथळा निर्माण केल्याने तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना जगदंबा देवी ट्रस्टच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले होते.
त्यानंतर जिल्हा पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोखंडे, तहसीलदार बिराजदार यांनीदेखील समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नालाही यश आले नाही. त्यामुळे सदर मंडपाचे नियोजन करता आले नाही.
दरम्यान, 21 सप्टेंबर रोजी तहसीलदार बिराजदार यांनी भ्रमणध्वनीद्वारे पूर्वीप्रमाणे मंदिराच्या समोरूनच दर्शनरांगेचे नियोजन करावे अशा सूचना दिल्या.
त्यामुळे उत्तर बाजूचे दर्शन रांगेचे नियोजन कोलमडल्यामुळे भाविकांना जगदंबा देवीच्या दर्शनासाठी मुख्य दरवाजातूनच प्रवेश दिला जाईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख यांनी सांगितले.ते म्हणाले की, सशुल्क पासची सुविधाही देण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.