

पारनेर: तालुक्यातील वाडेगव्हाण व नारायणगव्हाण येथे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला. त्यामुळे परिसरातील ओढे-नाले, तलाव काही वेळातच तुडुंब भरले. गावांत जाणारे रस्ते पाण्याखाली गेले. (Latest Ahilyanagar News)
अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतजमिनी तुडुंब भरून वाहिल्या. हाताशी आलेली पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली. शेतकर्यांचे 100 टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. काढणीला आलेली पिके, धान्य, लागवड झालेले कांदे, संसारोपयोगी साहित्य व जनावरांच्या खाद्याचे नुकसान झाले. परिसरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले.
झालेल्या पावसाची तीव्रता एवढी होती की लागवड झालेले कांदा पीक तसेच शेतजमीन वाहून गेली. शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरासमोरील उकिरडेही पावसामुळे वाहून गेल्याचे दिसले.
वाडेगव्हाण, नारायणगव्हाण, यादववाडी परिसरात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, पंचनामा करण्याची मागणी वाडेगव्हाणच्या सरपंच प्रियंका किशोर यादव यांनी केली आहे.
जिल्ह्यात आठ दिवसांत 128 मिलिमीटर पाऊस; पाच तालुक्यांत ओलांडली सरासरी
गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात सरासरी 128 मिलिमीटर पाऊस झाला असून, आतापर्यंत 91.4 टक्के म्हणजे सरासरी 409 मिलिमीटर पावसाचे नोंद झाली. पाच तालुक्यांना सरासरी ओलांडली आहे.
यंदा सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारण्यास प्रारंभ केला. ऑगस्टअखेर सरासरी 301 मिलिमीटर अपेक्षित असताना फक्त 270.5 मिलिमीटर नोंद झाली. 13 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात 281.5 मिलिमीटर नोंद होती. त्यानंतर पावसाने जोरदार आगमन केले. 14 सप्टेंबर पासून जिल्हाभरात दमदार पाऊस सुरूच आहे. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करीत खरीप पिकाचे नुकसान केले.
आठ दिवसांत 128 मिलिमीटर नोंद झाली. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी 448.1 मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. पावणेचार महिन्यात सरासरी 409 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. श्रीगोंदे, कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासे येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे.