Ajit Pawar Demise Pudhari
अहिल्यानगर

Ajit Pawar Demise: अहिल्यानगरचा आधारवड हरपला: अजितदादा पवारांच्या निधनाने विकासाभिमुख नेतृत्वाची पोकळी

राकट पण हळवे दादा, शब्दाला जागणारे नेतृत्व; अहिल्यानगरसाठी ५०० कोटींच्या विकासकामांची आठवण जागवणाऱ्या श्रद्धांजली

पुढारी वृत्तसेवा

दादा जितके राकट, कणखर स्वभावाचे, तितकेच हळव्या मनाचे. त्यांचे ओतप्रोत प्रेम मी जवळून अनुभवले आहे. शब्दाला जागणारे अन्‌‍ वक्तशिरपणाचे ते भोक्ते. अहिल्यानगर आणि दादांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. अरे संग्राम हे काम तू केले पाहिजे, असा दादांचा नेहमी फोन असायचा. सत्तेत सहभागी झाल्यानंतर दादांनी अहिल्यानगरसाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला. कार्यकर्त्यांना जीव लावणारे अन्‌‍ आपलासे करणारे दादा नाहीत, ही गोष्टच मन मान्य करायला तयार नाही. त्यांचे अकाली निधन धक्कादायक अन्‌‍ मनाला चटका लावणारे आहे. आमचा आधारवड हरपला आहे.

अजितदादा पवार यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाही. मी आज राज्याच्या राजकारणात आहेत. त्या पाठीमागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छबी आहे. अत्यंत तापड, परखड, स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेणारे नेतृत्व म्हणजे अजित दादा. अजितदादा आणि नगर हे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले. अहिल्यानगरमध्ये दादा ज्या ज्या वेळी मुक्कामास थांबले, त्या त्या वेळी ते कधीच हॉटेलमध्ये राहिले नाही. ते आमच्या घरी मुक्काम करीत असत. घरी साधेपणाने जेवण करीत. त्यांनी कधीच बडेजाव केला नाही. दादांचे प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष असे. घरी आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची आस्थेवाईकपणे चौकशी करीत. एकदा घराचे बांधकाम सुरू असताना दादा आले. त्यांनी घराच्या कामाची पूर्ण पाहणी केली. अरे संग्राम, ही वस्तू कोठून आणली. कितीला बसली, त्यात फायदा झाला की तोटा झाला, याचीही विचारणा करीत असत.

अजितदादांसारखा तत्पर व निर्णयक्षम नेता आता होणे नाही. अजितदादा यांनी कायम मोलाची साथ देत मार्गदर्शन केले. स्व. अरुणकाकांच्या निधनानंतरही त्यांनी मला व परिवाराला दु:खातून सावरण्यासाठी मोठा आधार दिला. आज आमचा पाठीराखा हरपला आहे. दादांनी अहिल्यानगरसाठी भरभरून निधी दिला. अनेक वेळा कामाचा प्रस्ताव दिल्यानंतर दादांनी मागणीपेक्षा जास्त निधी दिला. दादांनी जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी अहिल्यानगरसाठी दिला. 2014 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो, त्या वेळी राष्ट्रवादीची सत्ता नव्हती. पण दादा म्हणाले- आता आपली सत्ता नाही; पण सत्ता आल्यावर विकास काय असतो हे पाहायला मिळेल.

अजितदादांनी अहिल्यानगरसाठी भरभरून दिले ही न विसरता येणारी गोष्ट आहे. त्याची काही उदाहरणे :

हॉस्पिटलला निधी

महापालिकेच्या अत्याधुनिक हॉस्पिटलसाठी अजितदादांकडे 15 कोटींच्या निधीची मागणी केली. दादांनी सर्व माहिती घेतल्यानंतर हॉस्पिटल किती बेडचे आहे, असे विचारले. हॉस्पिटल शंभर बेडचे आहे, असे सांगितल्यावर दादांनी सांगितले- त्यासाठी निधी कमी पडेल. प्रस्ताव 35 कोटींचा करा. त्याला मंजुरी देतो. प्रस्ताव 35 कोटींचा तयार करून सादर केला अन्‌‍ दादांनी शब्द दिल्याप्रमाणे मंजूर केला.

आणखी निधी घे...

तरुणांना खेळण्यासाठी एकमेव मैदान असलेल्या वाडिया पार्क येथे खेळाडूंसाठी आणखी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी 52 कोटींचा निधी मिळावा, यासाठी अजित दादांकडे प्रस्ताव सादर केला. दादांनी तो प्रस्ताव मंजूर केला. पण दादा म्हणाले, अरे संग्राम सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शताब्दी वर्ष सुरू आहे. आपल्याला आणखी निधी देता येईल. वाडिया पार्क अत्याधुनिक स्टेडियम करता येईल. त्यासाठी आणखी 250 कोटींचा प्रस्ताव पाठवा. तसा प्रस्ताव दादांकडे पाठविला होता.

रस्त्यांसाठी 150 कोटी

शहरातील रस्त्यांसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी दादांकडे केली. दादा म्हणाले, अरे बाबा काय ते नगरचे रस्ते. मी नेहमी नगरला येतो. नगरमधील रस्त्यांची मोठी दयनीय अवस्था आहे. शहरात नगरोत्थानमधून मलनिस्सारण, ड्रेनेजसाठी निधी देता येतो. पण, मी अहिल्यानगर शहरातील रस्ते बांधणीसाठी विशेष पॅकेजमधून 150 कोटींचा निधी देतो, असे दादा म्हणाले. प्रस्ताव दिला आणि दादांनी प्रस्ताव मंजूर केला.

सीना नदीसाठी 20 कोटी: आमदार संग्राम जगताप

अजित दादांचे आजोळ राहुरी असल्याने त्याचे नेहमी येणे-जाणे होते. अहिल्यानगरच्या बारीकसारीक गोष्टींची माहिती होती. सीना नदीच्या सुशोभीकरणासंदर्भात अजित दादांकडे चर्चा केली असता दादा म्हणाले, अरं काय ती सीना नदी. सीनेचं पात्र पहिलं खूप मोठ होतं. आता एकदम छोटं झालंय. अतिक्रमणं काढली पाहिजे. त्यावर दादांनी सीना नदी सुशोभीकरणासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला.

विकासाभिमुख नेतृत्व हरपले: राम शिंदे

जामखेड ः दिलेला वेळ आणि शब्द पाळणारे, अशी ख्याती असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक वेळेआधीच आपल्याला सोडून गेले. एका स्पष्टवक्त्या, वक्तशीर, विकासाभिमुख नेतृत्वाला आपण मुकलो, अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, की प्रशासकीय नैपुण्य, संवेदनशील नेतृत्व आणि या सर्वांचा आधार असलेले धडाडीचे, विकासोन्मुख राजकारण, असे त्यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवील.

मित्र गमावला: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची घटना अत्यंत वेदनादायी असून, राजकारणापलीकडे जाऊन विचार करणारा एक मित्र आपण गमावल्याची भावना जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. विखे पाटील यांनी अजितदादांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षे विधीमंडळात आणि मंत्रिमंडळात त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. राज्याच्या विकासात्मक बाबतीत अनेकवेळा एकत्र बसून आम्ही निर्णय केले. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी त्यांची होती.अहिल्यानगरच्या विकास प्रक्रियेत त्यांचे नेहमीच सहकार्य मिळाले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळा अनावरण समारंभास त्यांची उपस्थिती ही आमच्या परिवारासाठी सदैव आठवणीत राहाणारा क्षण होता.

राजकारणापलीकडचे दादा: बाळासाहेब थोरात

रुबाबदार व्यक्तिमत्व, स्पष्ट आणि प्रशासनावर पकड असलेला, कायम जनतेत राहणारा नेता हरपला अशा शब्दांत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली वाहिली. संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने नवीन वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला, तो पाहण्यासाठी एक दिवस कोणालाही न सांगता अजितदादा थेट कारखान्यावर आले. आणि या नवीन प्रकल्पाचे अगदी तोंडभरून कौतुक करून, बारामतीसह सर्वत्र हा प्रकल्प कसा राबवता येईल याबाबतच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष नव्हता. अनेक वर्षे मंत्री म्हणून आम्ही सोबत होतो. राजकारणविरहीत सर्वांशी त्यांची मैत्री होती. ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना मोठी जाण होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT