सावकाश हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही, असं दादा अनेकदा म्हणायचे... वेळेचे तंतोतंत पालन करणारे हे नेतृत्व आज अवेळी आपल्यातून निघून गेले! अजितदादांचा आणि माझा संपर्क अतिशय जुना होता. 2007 साली मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून त्यांच्याशी माझा संबंध अधिक जवळचा होत गेला. राजकारणातला माझा प्रवास समजून घेणारे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि कायम प्रोत्साहन देणारे असे अजितदादा माझ्यासाठी फक्त नेते नव्हते, तर ते माझे आधार होते.
2012 साली जिल्हा परिषदेची दुसरी निवडणूक झाली. त्या वेळी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त सदस्य निवडून आले होते, तरीही उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार, असं ठरलं. त्या काळात अजित दादा मला वारंवार म्हणायचे, तू माझ्यासोबत काम कर. मला तुझ्यासारखे युवक हवेत. अनेक विषयांवर ते मला राजकीय मार्गदर्शन करायचे. मात्र त्याच निवडणुकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी माझं नाव पुढे येऊनही संख्याबळाच्या गणितामुळे अडचणी निर्माण झाल्या. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझ्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा केला आणि परिस्थिती ताणली गेली. त्या सगळ्या घडामोडींमुळे साहजिकच मला जरा राग आला होता.
या रागाच्या भरातच मी दादांना फोन केला. त्यांनी शांतपणे मला सांगितलं, तू शांत हो. मुंबईला ये, आपण भेटू.मुंबईला भेटल्यानंतर मी तक्रारीच्या स्वरात दादांना म्हणालो, दादा, तुम्ही माझी संधी हिरावून घेतली. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं, ते माझ्या राजकारणातल्या प्रवासातील सर्वात मोठी शिकवण ठरली. ते म्हणाले, राजकारण शेवटी राजकारणाच्या पद्धतीनेच करावं लागतं. आम्ही राज्यपातळीवर एक धोरण ठरवलं, त्यात तुझं नुकसान झालं, यासाठी मी तुला सॉरी म्हणतो. कडक स्वभावाचे नेते असूनही आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माणसाला सॉरी म्हणण्याचा तो मोठेपणा खऱ्या अर्थाने अजितदादांकडे होता.
त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये आणि प्रशासकीय कामांमध्ये त्यांचं मार्गदर्शन मला मिळत गेलं. अगदी अलीकडे राज्याचं युवा धोरण ठरवण्यासाठी जी समिती नेमली गेली, त्यात दादांनी माझी निवड केली. सगळ्या अधिकाऱ्यांना आणि क्रीडामंत्र्यांना त्यांनी स्पष्ट सांगितलं, सत्यजीतकडे चांगल्या कल्पना आहेत, त्याच्या पद्धतीने काम करा. यासोबतच अनेक वेळा सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. सत्यजीतची कामाची पद्धत चांगली आहे, असं त्यांनी जाहीरपणे सांगत माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, हा मोठेपणा फार थोड्या नेत्यांमध्ये असतो.
दादांचा स्वभाव कडक होता, त्यांच्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा होता, पण मनातून ते अतिशय हळवे होते. त्यामुळे त्यांच्या रोखठोक स्वभावाचा कधीही राग वाटला नाही. उलट थोड्याच वेळात दादांचा राग शांत होईल व आपले काम 100% होईल हा विश्वास कायम मनात असायचा. हा विश्वास फक्त माझाच नव्हता, तर राज्यभरातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मनात होता. लोकांनी हळूहळू त्यांच्या कामाच्या पद्धतीचा स्वीकार केला होता, म्हणूनच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं भविष्य खूप उज्ज्वल असेल असं वाटत होतं, पण या सगळ्या अपेक्षा आज एका क्षणात संपल्या! दादांचा कामाचा वेग अफाट होता. सतत प्रवास, वेळेचं काटेकोर पालन आणि कायम धावपळ! अतिशय वेगवान आयुष्य ते जगायचे. त्याच वेगामुळे आज त्यांच्या जाण्याची हानी अधिक तीव्रतेने जाणवते. त्यांच्या माध्यमातून राज्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतील, अशी माझी खात्री होती. आज ते स्वप्न भंग पावल्यासारखं वाटत आहे.
जनसेवा करताना हे लक्षात घ्यायला हवं की एक नेता तयार व्हायला अनेक वर्षे लागतात. अशा नेत्याच्या जाण्याने फक्त त्या कुटुंबाचं नाही, तर त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांचं, त्यांच्या आजूबाजूच्या संपूर्ण व्यवस्थेचं आणि भविष्यातील विकासात्मक दृष्टीचंही मोठं नुकसान होतं. अजितदादांच्या जाण्याने ती पोकळी आज प्रकर्षाने जाणवत आहे.आमदार सत्यजीत तांबे