कोपरगाव : जिल्ह्यात 11 सहकारी व 2 खाजगी अशा 13 साखर कारखान्यांनी दि. 27 नोव्हेंबरपर्यंत 18 लाख 66 हजार 253 मे. टन ऊसाचे गाळप करून त्यापासुन 12 लाख 67 हजार 530 साखर पोत्यांची निर्मीती केली आहे. दैनंदिन सरासरी गाळप ऊतारा 9.71 टक्के मिळाला आहे. जिल्हयात सर्वाधिक गाळप अंबालिका कारखान्याने करून आघाडी घेतली आहे.
अंबालिका कारखान्याने 3 लाख 88 हजार 345 मे. टन गाळप करून 2 लाख 40 हजार 800 साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. त्यांचा साखर उतारा हा 10.44 टक्के समोर आला आहे. याशिवाय ज्ञानेश्वर 2 लाख 13 हजार 230, गंगामाई 1 लाख 94 हजार 450, मुळा 1 लाख 92 हजार 880, नागवडे 1 लाख 71 हजार 160, भाऊसाहेब थोरात 1 लाख 50 हजार 860, पद्मश्री विखे पाटील 1 लाख 48 हजार 750, कर्मवीर काळे 1 लाख 21 हजार 360, अशोक 83 हजार 500, सहकारमहर्षी कोल्हे 66 हजार 94, अगस्ती 46 हजार 894, गणेश 23 हजार 400, वृद्धेश्वर 65 हजार 330 मे. टन याप्रमाणे गळीत झाले आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यात बहुतांश साखर कारखानदार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कार्यकर्त्यांच्या विजयासाठी प्रचार करत आहेत. यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे साखर कारखानदारीचे नेतृत्व काम करत आहे.
जिल्ह्यात 265 वाणाचा ऊस मोठ्या प्रमाणात आहे. त्यात शर्करा कंद कमी त्यामुळे उतारा चांगल्या प्रमाणात मिळत नाही. नवीन उसाच्या लागवडी होताना साखर कारखान्यांनी अधिक उतारा देणाऱ्या उसाचे बेणे अन्य ठिकाणाहून आणून ते सभासद शेतकऱ्यांना पुरवित आहे.
नगर जिल्ह्यात उसाला पहिली उचल 3000 रुपयापर्यंत देण्याची सुरुवात झाली आहे. जो कारखाना ऊसाला जास्त दर देईल, त्याकडे ऊस घालण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.