पाथर्डी : राज्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक येत असून, त्यापैकी 380 कोटी रुपयांची गुंतवणूक अहिल्यानगर जिल्ह्यात होत असून या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाच्या जागेत लवकरच एमआयडीसी उभारली जाणार असल्याची माहिती ल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी दिली.
पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथे हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कै. प्रमोदराव बाबुराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आमदार प्रसाद लाड, आमदार मोनिका राजळे, अक्षय कर्डिले, दिलीप भालसिंग, अभय आव्हाड, नीता लाड, संगीता भापसे, संस्थेचे सचिव कुशल भापसे, संगीता भापसे, सुभाष बर्डे, संभाजी दहातोंडे, काशिनाथ पाटील लवांडे, पुरुषोत्तम आठरे, सुनील परदेशी, एकनाथ आटकर, प्रतीक खेडकर, अजय रक्ताटे, शेषराव कचरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे म्हणाले की, सध्या निवडणुकांचा काळ असला तरी विकास अधिक महत्त्वाचा आहे. कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील आयटीआय संस्थांमध्ये आधुनिक शिक्षणासाठी मोठा निधी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून, राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीमुळे बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नीता लाड यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची उभारणी करून स्व. बाबूराव भापसे यांचे स्वप्न साकार केले आहे. समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य स्व. भापसे यांनी केले असून, त्यांचा सामाजिक वारसा कुशल भापसे समर्थपणे पुढे नेत असल्याचेही विखे यांनी सांगितले.
आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी या तालुक्याचा जावई असलो तरी येथील लोकप्रतिनिधी माझ्याकडून कोणतेही काम करून घेत नाहीत, याचे मला आश्चर्य वाटते. ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही फरक पडणार नाही. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत आमच्या युतीचे दीडशेहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. प्रास्ताविक कुशल भापसे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी तर आभार चैताली भापसे यांनी मानले.