नगर: जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडल्यानंतर सहकार विभागाचे सहनिबंधक संभाजी निकम यांनी सुनावणी घेतली. आज मंगळवारी (दि.१५) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रम अन् राजकीय समिकरणांनाही वेग येणार आहे. यातून, कशी कशी जुळवा जुळव होतेय, यावर सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे. जिल्हा बँकेची 3677 मतदारांची प्रारुप यादी जाहीर झाली आहे. यात, सर्वसाधारण 1360, बिगरशेती 1471 आणि शेतीपूरक 816 समावेश आहे. प्रारुप यादीवर 238 हरकती आल्या. त्याची सुनावणी होऊन आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
जिल्ह्यासह पक्षांतर्गत वर्चस्वाचीही लढाई
राजकीय प्रतिष्ठेमुळे आता जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ एका सहकारी संस्थेची निवडणूक राहिलेली नाही. जिल्ह्यातील राजकीय पकड, पक्षातील आपली ताकद आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ‘नेतृत्व अन् दिशा’ ठरविणारी ही निवडणूक असणार आहे. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
दोन संचालकांच्या लॉटरीचे समिकरण!
अंतिम मतदार यादीनुसार, कोणत्या तालुक्यात किती मतदार आहेत, त्या तालुक्यात कोणाची ताकद आहे, यातून निकाल कसा फिरू शकतो, याचा अभ्यास करूनच त्या त्या तालुक्याला किती जागा (उमेदवारी) द्यायच्या याचे गणित बांधले जाणार आहे. गेल्यावेळी अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत या सात तालुक्यांना अतिरीक्त एक एक संचालकाची लॉटरी लागली होती. यामध्ये एक बिगर शेती, एक शेतीपूरक, एक ओबीसी, एक अनुसूचित जाती-जमाती, एक भटव्या विमुक्त आणि दोन महिला प्रवर्गातून वरील सात ठिकाणी दोन-दोन संचालक दिसले. तर, नगर, राहुरी, राहाता, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्याला एकच एकच संचालक मिळाला होता. यावेळी कोणते तालुके असतील, याविषयी अंतिम मतदार यादीनंतर अंदाज बांधले जाणार आहेत.
पारनेरमध्ये नेमकं काय घडतयं?
निवडणूक कोणतीही असो, पारनेर नेहमीच चर्चेत असते. गेल्या वेळी सोसायटी मतदार संघातील 14 पैकी 11 जाता बिनविरोध झाल्या, मात्र पारनेरचे ॲड. उदय शेळके यांची जागा बिनविरोध होऊ शकली नव्हती. त्याचबरोबर पारनेरचे प्रशांत गायकवाड यांनाही बिगरशेती मतदार संघातून निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. हे दोन्ही उमेदवारी राष्ट्रवादीचे होते. दोघेही विजयी झाले होते. मात्र, पारनेरमध्ये आगामी बँकेच्या निवडणुकीतही आतापासून एकमेकांवर दंड थोपटले जात असल्याने, यंदाही बिनविरोध नाहीच, असे चित्र आहे. पाचवर्षापूर्वी नगर सोसायटी मतदार संघातून शिवाजी कर्डिले, आणि कर्जत सोसायटीतून अंबादास पिसाळ यांनाही निवडणूकीला सामोरे जावे लागले होते. ते दोघेही विजयी झाले.
यंदा गणित कसे?
आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार, तालुक्यातील मतदारांची संख्या पाहताच निकालाचेही अंदाज बांधले जाणार आहेत. सोसायटी मतदार संघात प्रत्येक तालुक्यात एक जागा निवडणूक येणार आहे. बिगर शेती, शेतीपूरकचे मतदार त्या त्या उमेदवाराच मतदान करणार आहेत. तर सर्व 14 तालुक्यातील एकूण मतदार हे दोन महिला, एक ओबीसी, एक अनुसूचित जाती-जमाती, आणि भटक्या विमुक्तमधील अशा पाच उमेदवारांना मतदान करणार आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुकांकडून तसेच श्रेष्ठींकडूनही यादीचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे.