

नगर: गणपती बाप्पा मोरया.. मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषाने अवघी अहिल्यानगरी दुमदुमून गेली. शहर व परिसरात सोमवारी (दि.१४) लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बाप्पांच्या स्वागतासाठीच सार्वजनिक मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शहरातील मानाच्या गणरायासह घराघरांत भक्तीभावाने श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण शहरात मांगल्याचे व चैतन्याचे वातावरण संचारले आहे.
श्रीगणेश चतुर्थीनिमित्त सोमवारी (दि.१४) सकाळपासूनच जिल्हाभर नवचैतन्य निर्माण झाले. पूजा साहित्य, दुर्वा आणि फुलांच्या खरेदीसाठी नगरच्या भुसार बाजार आणि मुख्य बाजारपेठांत तसेच उपनगरांत नागरिकांची पहाटेपासूनच गर्दीं उसळली होती. शहर आणि उपनगरातील मिठाईच्या दुकानांत मोदक खरेदीसाठीही रांगा लागल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून घराघरांत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आरस उभारण्याची लगबग सुरू होती. सोमवारी सकाळीच नागरिकांनी बाजारपेठ गाठत मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली. त्यानंतर घराघरांत गणपतींचे स्वागत गुलाल उधळणीने केले. पारंपरिक आरत्या गाऊन भक्तिभावाने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
बाप्पाच्या स्वागतासाठी नगर शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सोसायट्यांमध्ये आकर्षक कमानी उभारल्या आहेत. सकाळी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच, मानाच्या गणेश मंडळांनीही मिरवणुका काढून श्री गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी मात्र भव्य आणि जोषात मिरवणुका काढत ढोल-ताशांच्या बाप्पाचे स्वागत केले.
सावेडी, नालेगाव, कल्याण रोड, बागडपट्टी परिसरात ढोल पथकांसह डीजेच्या दणदणाटात बाप्पांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे डीजे बंदीच्या चर्चेच्या हवेत विरल्या असून, अखेर डीजे वाजलाच अशी चर्चा नगरकरांमध्ये सुरू होती. पोलिस प्रशासनाकडून मात्र आवाजाची पातळी ओलांडली गेली नसल्याचा दावा केला जात आहे. बहुतांश मंडळांच्या मिरवणुकीत आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे बॅनर झळकत होते.
दरम्यान, पोलिसांनी शहरात चौका-चौकात चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. रात्री उशिरापर्यंत बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या. दरम्यान, श्रींचे पावसासह आगमन होईल अशी आशा होती. मात्र, दिवसभरात कुठेही सरी दिसल्या नाहीत. अशा परिस्थितीतही आगामी अकरा दिवस प्रबोधात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच देखाव्यांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्धार नगरकरांनी केला आहे.
सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी
अहिल्यानगर शहरात माळीवाडा, कल्याण रोड, केडगाव, सावेडी, बोल्हेगाव परिसरात सजावटीच्या साहित्याची दुकाने रस्त्यावर थाटली होती. सकाळपासूनच सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. कृत्रिम फुलांच्या माळा, छोटे झुंबर, मखर, आकर्षक विद्युत रोषणाईला भक्तांची पसंती होती.
ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात एसपींच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना
अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मंगलमय वातावरणात जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका व त्यांच्या पत्नी गायत्री मुम्मका यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, पंडित खरपुडे, अशोक कानडे, पांडुरंग नन्नवरे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा. माणिकराव विधाते, नितीन पुंड, चंद्रकांत फुलारी, हरिभाऊ फुलसौंदर, विजय कोथिंबीरे, संजय चाफे उपस्थित होते. नगरवासियांनीही पारंपरिक पद्धतीने, भक्तिभावाने, शांततेत व नियमांचे पालन करून आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी केले.