नगर: जिल्हा परिषदेचा सन 2026-27 चा 59 कोटी 55 लाख 31 हजार 481 रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शुक्रवारी सादर केला. ऊस, डाळिंब उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानासह दिव्यांगाना शेवई मशीन, मागासवर्गीयांना हॅण्डऑपरेटेड पॉवर वीडर इत्यादी नावीन्यपूर्ण व सर्वसमावेशक योजनांचा त्यात समावेश आहे. भंडारी यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात 2026-27 साठीचा 7 लाख 27 हजार 631 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला.
प्रशासक म्हणून झेडपीतील चौथा तर सीईओ भंडारी यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडला. या वेळी कॅफो शैलेश मोरे, सामान्य प्रशासनचे राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, ग्रामपंचायतीचे दादासाहेब गुंजाळ, महिला व बालकल्याण विभागाचे संजय कदम, समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उत्तरेचे दिलीप नन्नावरे, कृषीचे सुधीर शिंदे, लघू पाटबंधारेचे शिवम डपकर, पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे, आगलावे, निकम, खरात आदी उपस्थित होते.
सायन्स पार्कमध्ये आता रोबोटही
गेल्या वर्षी तरतूद करूनही कंत्राटदारांची अडचण आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये निधी वळवावा लागल्याने ओपन सायन्स पार्क ही योजना गुंडाळावी लागली होती. मात्र या वर्षी पुन्हा 50 लाखांची तरतूद करण्यात येऊन योजना पुढे चालू ठेवली आहे. यात एआय तंत्रज्ञानाच्या आधारे रोबोट कसा तयार होतो, तो कसे काम करतो, हे देखील विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.
इस्रोची हवाई सहल कायम
मिशन स्पार्क अंतर्गत इस्रो सहल घडविण्यासाठी प्रशासनाने 30 लाखांची तरतूद केली आहे. जिल्ह्यातून 42 मुलांनाही सहल घडवली जाणार आहे. यात आणखी 24 विद्यार्थ्यांना सहलीला नेता येईल का, याचा सीईओंकडून विचार केला जात आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव
एकुलती एक लाडक लेक या नावीन्यपूर्ण योजनेतून एका मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक 25 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनला आता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीसाठी वाढीव तरतूद
मिशन आरंभमधून तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची तयारी करून घेण्यासाठी सराव परीक्षा घेणे, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, ऑनलाईन तासिका घेणे यासाठी 22 लाख, तर इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्तीसाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 70 लाखांनी ही तरतूद वाढवली आहे.
शेवई मशीन अन पिकोफॉल...
यंदा दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी शेवई मशीन दिली जाणार आहे. त्यासाठी 27.40 लाखांची तरतूद असून, यातून 110 लाभार्थ्याना लाभ मिळणार आहे. मागासवर्गीय महिलांसाठी यंदा पिकोफॉल मशीनसाठी 70 लाखांची तरतूद आहे.
मुख्यमंत्री समृद्ध योजनेला दोन कोटी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी 1 कोटी 84 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातून ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तरतूद करण्यात आल्याचे सीईओ भंडारी यांनी सांगितले.
यंदा सात कोटींचे उत्पन्न वाढणार
मुद्रांक शुल्क, स्थानिक उपकर, वाढीव उपकर यातून उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे या वर्षी उत्पन्नात साधारणतः सात कोटींची भर पडणार असल्याचे आकडे सांगत आहेत.
शेतकरी मदतीसाठी तरतूद वाढवली
शेतकऱ्यांची जनावरे मृत झाल्यानंतर दोन ते दहा हजारांपर्यंत मदत करण्यासाठी 30 लाखांची तरतुद आहे.
एआय करेल उत्पादन खर्च कमी, उत्पन्न जास्त
जिल्ह्यात 1.38 लाख हेक्टरवर ऊस आहे. यातून सरासरी 101 टन हेक्टरी उत्पादन निघते. डाळिंबाचे क्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन, उत्पन्न्न वाढीसाठी सेसमधून कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित प्रात्याक्षिकांसाठी 90 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. यातून आधुनिक तंत्रज्ञानाचे 200 पेक्षा जास्त युनिट उभारले जाऊन, यातून एक हजार शेतकऱ्यांना पिकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी 50 लाख
जिल्हा परिषदेतून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी 50 लाखांची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून निविदा प्रसिद्ध केली असून, मोठ्या लोकसंख्येच्या ठराविक गावांत भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. त्यासाठी निवारा केंद्र देण्याचा खर्च हा झेडपी, तर इतर खर्च स्थानिक ग्रामपंचायत करणार आहे.