

नगर : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे सन 2025-26 चे अंतिम सुधारित तसेच 2026-27 चे मूळ व कार्यक्रम अंदाजपत्रक आज दि. 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सादर होणार आहे. प्रशासकांच्या माध्यमातून सादर केला जाणारा हा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे यामध्येही नावीन्यपूर्ण काय काय असेल, कोणत्या योजनांना कात्री लावणार, शिलकी की तुटीचा अर्थसंकल्प असणार, याकडे लक्ष असणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हे अंदाजपत्रक मांडणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्यामुळे मागील 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या तीन वर्षांपासून अर्थसंकल्प प्रशासकांकडूनच सादर केला जात आहे. त्यामुळे 2026-27 चा हा चौथा अर्थसंकल्पही प्रशासकांच्या माध्यमातूनच मांडला जाणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पाकडे जिल्हा परिषद वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण जिल्हा परिषदेची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. स्व उत्पन्नापेक्षा शासनाच्या करांवर जास्त भिस्त असल्याचे दिसून आले. व्हीपीडीए प्रणालीमुळे झेडपीला मिळणारे व्याजही कमी होणार आहे. त्यामुळे शिलकी राहणार की तूट दाखवली जाणार, कोणत्या योजनांना कात्री लागणार आणि कोणत्या नवीन योजना जाहीर होणार, याचे चित्र या अंदाजपत्रकातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प जणू ‘खुल जा सिम सिम’ ठरणार असल्याची चर्चा आहे.
याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनाह पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद प्रशासन उत्पन्न वाढवण्यासाठी कोणती नवी साधने शोधणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नवीन पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयीन केबिन, वाहन व्यवस्था यासाठी काही तरतुदी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तथापि, या अर्थसंकल्पात शेतकरी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, तसेच आरोग्य क्षेत्रासाठी कोणत्या योजना आणि निधीची तरतूद होणार, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नावीन्यपूर्ण आणि विकासाभिमुख बजेटच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे 2025-26 या आर्थिक वर्षाचे 52 कोटी 54 लाख 90 हजार 426 रुपयांचे मूळ अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सादर केले होते. 2024-25 च्या तुलनेत अडीच कोटींनी यात वाढ झाली होती. त्यामुळे आज दुपारी तीन वाजता सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात नेमकं बजेट काय सांगणार, याकडे लक्ष आहे.