Fake Disability Certificate Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar ZP Fake Disability Certificate: 17 कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस; कारवाईचे संकेत

जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानंतर प्रशासनाकडून सुस्पष्ट अभिप्राय मागविणार, दोषींवर तातडीची कारवाई संभव

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे वृत्त बाहेर येताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त अहवाल आणखी सुस्पष्ट मिळावा, यासाठी झेडपीतून पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर लागलीच संबंधितांवर कारवाई सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून समजले.

जिल्हा परिषदेच्या 203 कर्मचाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्याचा अहवाल नुकताच झेडपी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामध्ये 17 कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राचा आणि त्यांची शारीरिक तपासणी केल्यानंतर ‌‘तसा‌’ काहीही संबंध नसल्याचे पुढे आले आहे.

त्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व हे ‌‘0 टक्के‌’ असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट नमूद आहे. अनेकांचे केसपेपर, यूडीआयडी अशी कागदपत्रे जिल्हा रुग्णालयात सापडलेली नाहीत. त्यामुळे हे प्रमाणपत्र संशयास्पद दिसले आहे.

मात्र, सीईओंना अहवालातील अभिप्राय गोंधळ निर्माण करणारे वाटले आहेत. त्यामुळे त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांना जिल्हा आरोग्य प्रशासनाला पत्रव्यवहार करून या संदर्भात स्पष्ट अभिप्राय देण्याबाबत सूचना केल्याचे समजले.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने सर्व चौकशी अहवालात शेवटच्या काही ओळींमध्ये ‌‘शून्य टक्के‌’ दिव्यांगत्व असल्याचे नमूद केलेले असतानाही, आता जिल्हा परिषद प्रशासनाला यापेक्षा आणखी कोणता सुस्पष्ट अभिप्राय हवा आहे? याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT